"केस नसताना डोक्यावरून कंगवा फिरवणारे खूप"; गडकरींचा मुख्यमंत्रिपदावरून मविआच्या नेत्यांना चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 01:28 PM2024-11-11T13:28:32+5:302024-11-11T13:34:52+5:30
Nitin Gadkari on Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून दावेदारी केली गेली. इच्छुकांबद्दल बोलताना नितीन गडकरींनी टोलेबाजी केली.
Nitin Gadkari News in marathi: महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी चिमटा काढला. केस नसताना डोक्यावर कंगवा फिरवणारे खूप लोक असतात, असे गडकरी म्हणाले. महाविकास आघाडीला बहुमतच मिळणार नाही, असे राजकीय भाकितही नितीन गडकरींनी केले.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीला नितीन गडकरींनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडीतील अंतर्गत कलहावर सूचक भाष्य केले.
काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून जोरदार दावेदारी सुरू आहे, तुम्ही याकडे कसं बघता? असा प्रश्न नितीन गडकरींना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना नितीन गडकरींनी महाविकास आघाडीला टोला लगावला.
"सिनेमा आला होता, थांब टकल्या भांग पाडते"
नितीन गडकरी म्हणाले, "नाही, त्यांच्या दावेदारीत काही अर्थ नाही. असं प्रत्येक जण दावेदारी करत असतो. एक सिनेमा आला होता, 'थांब टकल्या भांग पाडते'. केस नसताना डोक्यावर कंगवा फिरवणारे खूप लोक आहेत. नाना (नाना पटोले) त्यातले आहेत, असं मला म्हणायचं नाही."
"महाविकास आघाडी ही सर्कस आणि शरद पवार रिंगमास्टर"
गडकरी पुढे म्हणाले, "आता सध्या आघाडीमध्ये खूप मुख्यमंत्री आहेत. काही सुप्त आहेत, काही अतृप्त आहेत. काही दिसतात, काही दिसत नाहीत. पण, ही खरी सर्कस आहे आणि या सर्कसीमध्ये रिंगमास्टर आहेत शरद पवार. ते आहेत म्हणून ही सर्कस टिकून आहे", असे गडकरी म्हणाले.
"शरद पवार ज्या दिवशी थांबतील, एक मिनिटातं डौलारा खाली पडेल. त्यामुळे त्यांनी सांभाळून ठेवलं आहे. त्यामुळे सध्यातरी जोपर्यंत निवडणूक होत नाही... पहिलं तर बहुमतच मिळणार नाही. मिळाली तर हे बनतील अशी शक्यता नाही. तोपर्यंत प्रत्येकाने मनात आनंद घेतला की, मी होणार आहे. तर तेवढे दिवस त्यांना आनंद घेऊ द्या", असा चिमटा नितीन गडकरींनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रिपदासाठी असलेल्या इच्छुकांना काढला.