नितीन गडकरी, माणिकराव ठाकरे, आदींचे भवितव्य आज यंत्रबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 05:42 AM2019-04-11T05:42:16+5:302019-04-11T05:42:51+5:30
पहिल्या टप्पा; प्रशासनाची जय्यत तयारी
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांमध्ये उद्या, गुरुवारी मतदान होत असून, नितीन गडकरी, हंसराज अहीर या केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, नाना पटोले, किशोर गजभिये आदींचे भवितव्य यंत्रबंद होणार आहे.
नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी, काँग्रेसचे नाना पटोले, बसपाचे मोहम्मद जमाल, वंचित बहुजन आघाडीचे मनोहर उर्फ
सागर डबरासे यांच्यासह ३० उमेदवार रिंगणात आहेत. रामटेकमध्ये शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमान, काँग्रेसचे किशोर गजभिये, बसपाचे सुभाष गजभिये, वंचित बहुजन आघाडीच्या किरण पाटणकर-रोडगे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात आहेत. यवतमाळ-वाशीम मतदारसंघात मुख्य लढत शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्यात आहे. तर वर्धात भाजपचे रामदास तडस आणि काँग्रेसच्या चारुलता टोकस यांच्यात मुख्य लढत होत आहे. भंडारा-गोंदिया मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत भाजपचे सुनील मेंढे आणि राष्टÑवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे यांच्यात आहे. चंद्रपूरमध्ये १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मुख्य लढत भाजपचे हंसराज अहीर आणि काँग्रेसचे बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर यांच्यात आहे. गडचिरोली- चिमूर मतदारसंघात ५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून मुख्य लढत भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे नामदेव उसेंडी यांच्यात आहे. नक्षल कारवायांच्या सावटात मोठ्या पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
या दस्तावेजापैकी कोणताही पुरावा वैध
ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल, तर अशा वेळी पासपोर्ट, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे पासबुक, पॅन कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका,
कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/ आमदार/ विधानपरिषद सदस्य
यांना दिलेले ओळखपत्र आणि आधार कार्ड याआधारे मतदारांना
मतदान करता येईल.