नितीन गडकरी म्हणजे झपाटल्यासारखे काम करणारे नेतृत्व - राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2017 06:06 AM2017-05-27T06:06:16+5:302017-05-27T11:27:34+5:30

महाराष्ट्रात १९९५ मध्ये शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले आणि माझ्या आठवणीप्रमाणे सर्वात उशिरा मंत्रिमंडळात समावेश झालेले मंत्री म्हणजे नितीन गडकरी.

Nitin Gadkari is a swift leader - Raj Thackeray | नितीन गडकरी म्हणजे झपाटल्यासारखे काम करणारे नेतृत्व - राज ठाकरे

नितीन गडकरी म्हणजे झपाटल्यासारखे काम करणारे नेतृत्व - राज ठाकरे

Next

राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
महाराष्ट्रात १९९५ मध्ये शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले आणि माझ्या आठवणीप्रमाणे सर्वात उशिरा मंत्रिमंडळात समावेश झालेले मंत्री म्हणजे नितीन गडकरी. नागपूरच्या या गृहस्थाबद्दल मलाच काय, मुंबईत कित्येकांना विशेष माहिती नव्हती. हळूहळू सार्वजनिक बांधकाम खात्यातील त्यांच्या कामाचा धडाका सर्वांसमोर येऊ लागला आणि बहुधा त्याच दरम्यान आमची गाठ पडली आणि दोस्ती झाली.
मुंबईमधील ५५ उड्डाणपूल आणि सर्वांत ऐतिहासिक म्हणजे, ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे’ या कामातून जरी महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली असली, तरी त्यामागील ध्येयासक्ती आणि झपाटल्याप्रमाणे काम करण्याची पद्धत माझ्यासारख्या निकटवर्तीयांना जवळून पाहता आली. त्यानंतर, आलेल्या विरोधी पक्षनेत्याची जबाबदारीदेखील त्यांनी दमदारपणे पार पाडली. पत्रकारांकडून मला समजत असे की, विधान परिषदेच्या सभागृहात गडकरी उपस्थित नसले, तर सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री सुस्कारा सोडत असत.
आईकडून आलेला संघ संस्काराचा घट्ट पगडा, व्यक्ती म्हणून सदा हसतमुख, विनोदाची उत्तम जाण आणि खाण्याची प्रचंड आवड असे थोडक्यात वर्णन करता येईल, असा हा माणूस. मुख्य मुंबईतील आणि उपनगरातील जवळपास सर्व गल्ल्या व पुणे-नागपूर आणि ठाणे येथील छोट्या-छोट्या खाण्याच्या जागा येथे नितीन गडकरी यांचा मुक्तसंचार असतो. सरकारी सुरक्षा, लाल दिव्याची गाडी टाळून आणि प्रसंगी स्कूटर चालवतदेखील ते खाण्याच्या ठिकाणी पोहोचतात म्हणजे पोहोचतातच. मनस्वीपणा हा रक्तात असावा लागतो...तो शिकून येत नाही. एखाद्या विषयावर भरभरून बोलताना त्यांच्या तोंडात नागपुरी शिव्या यायच्या आणि या शिव्या येऊन गेल्यावर त्यांना एकदम संकोचल्यासारखे व्हायचे व ते आदरणीय बाळासाहेबांना दिलगिरी व्यक्त करायचे, पण बाळासाहेबांचेदेखील गडकरी यांच्यावर प्रचंड प्रेम होते. ते चेष्टेमध्ये नेहमी त्यांना ‘शिवसेने’त येण्याचा आग्रह करायचे; कारण त्यांना त्यांच्यामधील मनस्वीपणाच आवडत असावा.
शिवाजी मंदिर, रवींद्र नाट्यमंदिर इत्यादी ठिकाणी कोणते नाटक लागले आहे, नवा कोणता चित्रपट बघण्याचा सोडू नये. गाण्यांचा कार्यक्रम कुठला चांगला आहे. इथपासून ते पुणे, ठाण्यामधल्या कुठल्या हॉटेलात मिसळ, भजी वैगेरे चांगली मिळते, याचा चालता-बोलता ‘एनसायक्लोपीडिया’ म्हणजे, आपले नितीन गडकरी. माझ्या शिवाजी पार्क येथील घराच्या पाठीमागील फूटपाथवर रात्री उशिरा कित्येकदा बर्फाचा गोळा खायला ते येतात आणि शिवाजी पार्क मैदानाच्या कट्ट्यावर बसून ठरावीक मित्रांबरोबर गप्पाटप्पा करतात. कधी-कधी माझ्या घरीदेखील येतात. त्यांच्या-माझ्या असंख्य गप्पाष्टकांमध्ये विदर्भ, मराठवाडा येथील समाजजीवन आणि एकंदरीतच विकास कामांबद्दल त्यांच्या स्वत:च्या अफाट कल्पना यांचा प्रामुख्याने समावेश असतो.
नितीन गडकरी यांचे कुटुंबीय म्हणजे, कांचन वहिनी, निखिल, सारंग आणि केतकी हे नेहमी मी नागपूरला गेल्यावर अतिशय अगत्याने भेटायला येतात आणि मला प्रकर्षाने जाणवलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नितीन यांच्या मुलांनी नेहमी राजकारण अथवा त्या पाठोपाठ येणाऱ्या प्रसिद्धीच्या प्रकाशझोतापासून स्वत:ला यशस्वीपणे दूर ठेवले आहे. विदर्भासारख्या ठिकाणी साखर कारखान्याचे मॉडेल सातत्याने अपयशी ठरूनदेखील त्यातच हात घातला आणि सामाजिक जाणिवेतून तो यशस्वी करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले आणि यात मुलांनीदेखील स्वत:ला झोकून दिले. म्हणूनच मला असे वाटते की, नितीन गडकरी यांच्या कुटुंबीयांचे योगदान डोळ््यात भरण्यासारखे आहे.
गेल्या अडीच-तीन वर्षांपासून नितीन गडकरी दिल्लीत गेल्यामुळे माझा पूर्वीसारखा सतत संपर्क राहत नाही, परंतु कधीही फोनवर कामाचे बोलणे होते आणि इतरही विषय झाले, तरी एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे, त्यांच्यात यत्किंचितही बदल झालेला नाही, ते होते तसेच आहेत... नाही म्हणायला आत्ताच समजले की, ते साठाव्या वर्षात प्रवेश करत आहेत...हा एवढाच काय तो बदल म्हणता येईल. त्यांच्या भावी कारकिर्दीला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा. त्यांना उत्तरोत्तर यश, स्वास्थ आणि दिगंत कीर्ती प्राप्त होवो, ही ईश्वर चरणी प्रार्थना.

Web Title: Nitin Gadkari is a swift leader - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.