Nitin Gadkari: "सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच मोठी समस्या", नितीन गडकरींचा पक्षाला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 04:42 PM2022-08-21T16:42:17+5:302022-08-21T16:47:26+5:30
Nitin Gadkari NATCON 2022: नितीन गडकरींचे पखं छाटण्यासाठीच भाजपने त्यांना संसदीय समितीतून वगळण्याची चर्चा सुरू आहे.
मुंबई: काही दिवसांपूर्वीच भाजपची संसदीय समिती जाहीर झाली, त्यात पक्षाचे पहिळ्या फळीतील नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना स्थान देण्यात आलं नाही. यानंतर गडकरींचे पंख छाटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर अद्याप गडकरी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, एका कार्यक्रमात विकासकामांच्या दिरंगाईवर बोलताना नितीन गडकरी यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
आज असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सने आयोजित केलेल्या 'NATCON 2022’ कार्यक्रमाला नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, ''बांधकाम क्षेत्रात वेळेला खूप महत्त्व आहे, वेळ हीच आपली खरी संपत्ती आहे. प्रोजेक्ट आखले जातात, पण ते वेळेत पूर्ण कसे होतील, याकडे लक्ष दिलं पाहिजे. मात्र, सरकारची सर्वात मोठी समस्या ही आहे, की सरकार वेळेवर निर्णय घेत नाही,'' असा घरचा आहेर गडकरी यांनी दिला.
Addressing ‘NATCON 2022’ organised by the Association of Consulting Civil Engineers, Mumbai https://t.co/XzbWkbhZqQ
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 21, 2022
ते पुढे म्हणाले की, "खरं सांगायचं तर आमच्याकडे पैशांचा प्रोब्लेम नाही. बँका वाटेल तेवढं कर्ज देण्यास तयार आहेत. प्रश्न आहे मानसिकतेचा. पैशांची अडचण येत नाही, पैसा उभा राहतो. मात्र तो वेळेवर पूर्ण होत नाही, याची खंत वाटते. माझं प्राधान्य हे प्रकल्प आखणीबरोबरच ते वेळेत कसे पूर्ण होतील, याकडे असतं. माझ्या खात्याचं बोलायचं झालं तर भारतभर धडाक्यात प्रोजेक्ट सुरू आहेत. आता प्रकल्प उभारणीबरोबरच ते वेळेत कसे पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यायला हवं", असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.