नितीन गडकरी यांची सर्वपक्षीय गुगली

By admin | Published: January 29, 2016 01:11 AM2016-01-29T01:11:35+5:302016-01-29T01:11:59+5:30

चौपदरीकरण भूमिपूजन : व्यासपीठावर नारायण राणे, अनंत गीते आणि भास्कर जाधवही

Nitin Gadkari's all-party googly | नितीन गडकरी यांची सर्वपक्षीय गुगली

नितीन गडकरी यांची सर्वपक्षीय गुगली

Next

रत्नागिरी : अनेक दिवस चर्चेत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन अखेर शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित राहणार आहेत. अनेक वर्षे रखडलेल्या महामार्ग चौपदरीकरणात आता कसलाही अडथळा येऊ नये, यासाठी गडकरी यांनी ‘सर्वपक्षीय गुगली’ टाकली आहे. त्यामुळे भूमिपूजनाच्या व्यासपीठावर भाजपच्या नेत्यांबरोबरच काँग्रेसचे कोकणचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री भास्कर जाधव हेही दिसतील. व्यासपीठ सर्वपक्षीयांचे व्हावे, यासाठी गडकरी यांनीच पुढाकार घेतला असल्याचे वृत्त आहे.
वाढती वाहतूक आणि त्यामुळे होणारे वाढते अपघात यामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी गेली काही वर्षे सातत्याने उचलून धरली जात आहे. त्याला रायगड जिल्ह्यातून सुरूवातही झाली आहे. मात्र, तेथील काम पूर्णपणे रखडले आहे आणि रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामाला सुरूवातच झालेली नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर आणि नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक व महामार्ग खात्याचे केंद्रीय मंत्रीपद स्वीकारल्यानंतर या कामाला गती मिळाली. गेल्या वर्षभरात या कामाकडे अतिशय प्राधान्याने पाहिले जात आहे. त्यासाठी भूसंपादन प्रक्रियाही गतीने राबवण्यात आली आहे.
काही ठिकाणी पर्यायी मार्गासाठी तर काही ठिकाणी उड्डाण पुलांसाठी आग्रह धरण्यात आला आहे. लोकांकडून हरकती मागवून त्यावर तत्काळ सुनावणी घेण्यात आली आहे. भूसंपादनाचे काम पूर्ण झाले नसले तरीही या चौपदरीकरण्याच्या भूमिपूजनाचे काम तत्काळ हाती घेण्यात आले आहे. शुक्रवार २९ रोजी रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे सकाळी १0 वाजता हा भूमिपूजन कार्यक्रम नितीन गडकरी यांच्याहस्ते होणार आहे. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित राहणार आहेत.
गेल्या काही दिवसात माजी खासदार नीलेश राणे यांनी रत्नागिरीत तर आमदार नितेश राणे यांनी कणकवलीत मोबदल्याच्या मुद्द्यावरून तीव्र विरोधाची भूमिका घेतली आहे. चिपळुणात भास्कर जाधव यांची ताकद लक्षात घेण्याजोगी आहे. तेथे बहादूरशेख नाका ते पाग या मार्गासाठी उड्डाण पूल उभारण्याची मागणी झाली आहे. दुसऱ्या बाजूला जिल्ह्यात शिवसेना अधिक सक्षम आहे. राजकीय पातळीवर होणाऱ्या विरोधामुळे महामार्ग चौपदरीकरणाचे काम थांबू नये, रेंगाळू नये, यासाठी नितीन गडकरी यांनी गुगली टाकली आहे. भूमिपूजन कार्यक्रमाच्या व्यासपीठावर त्यांनी सर्वपक्षीयांना आमंत्रित केले आहे. त्यामुळे भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांसोबत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव हेही दिसतील.
कोणाच्याही विरोधाने महामार्ग चौपदरीकरणाचे काम रेंगाळू नये, यासाठी हा खटाटोप करण्यात आला आहे आणि ही राजकीय मुत्सद्देगिरी नितीन गडकरी यांनीच दाखवली आहे, अशी माहिती पुढे येत आहे. कार्यक्रम कोकणातील महामार्गाचा असल्याने कोकणातील सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांना बोलावण्यात आले असल्याचे दाखवण्यात येत असले तरी विरोध थांबवण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे श्रेय घेण्याची मोठी संधी असतानाही या कार्यक्रमाला सर्वपक्षीयांना बोलावून गडकरी यांनी पुढील काळात येऊ शकणाऱ्या अडचणी कमी केल्या आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका नेत्याने व्यक्त केली. (प्रतिनिधी)


बाळ माने : नव्या इनिंगसाठी जोरदार तयारी
भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून माजी आमदार बाळ माने यांनी नुकतीच आपली नवी इनिंग सुरू केली आहे. अन्य पक्षांसह शिवसेनेला टक्कर देत भाजप वाढवण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला असून, त्यातूनच चौपदरीकरणासाठी घेतलेल्या जमिनीचा पाचपट मोबदला देण्याचा मुद्दा त्यांच्याकरवी पुढे आणण्यात आला आहे.

विरोध मावळेल
सर्वच पक्षाच्या नेत्यांना एका व्यासपीठावर आणल्यामुळे चौपदरीकरणाच्या कामाला दाखवला जाणारा विरोध मावळेल, अशी आशा भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे.


तरूण फळी मैदानात
बाळ माने यांच्या जिल्हाध्यक्ष पदावरील निवडीनंतर भाजपातील तरूण फळी नव्या जोमाने मैदानात उतरली आहे. त्यांनी जिल्हाध्यक्ष पद घेतल्यानंतर काही दिवसातच आधी मुख्यमंत्री, आता केंद्रीय मंत्री रत्नागिरीत येत असल्याने भाजपने पक्षवाढीवर भर देण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच माने यांनी तरूण पिढीला झुकते माप देत पुढे आणले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दोन दिवसातच आणखी एक केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हेही रत्नागिरीचा दौरा करणार असल्याने हा उत्साह दुणावला आहे.


गोषवारा मुंबई-गोवा
महामार्ग चौपदरीकरणाचा ...
इंदापूर ते झाराप या रायगड, रत्नागिरी, व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६६.१७० किलोमीटर्स मार्गाच्या चौपदरीकरण कामाला २१ जून २०१३, ४ जून २०१३ व ६ जून २०१३ अन्वये मान्यता.
मुंबई-गोवा महामार्गाची डेड ट्रॅक ही प्रतिमा चौपदरीकरणानंतर बदलणार आहे. गेल्या काही वर्षात महामार्गावरील अपघातात हजारावर प्रवाशांचा मृत्यू झाला तर शेकडो जखमींना अपंगत्व आले आहे.
पत्रकार संघटनेचा चौपदरीकरणाचा लढा व नागरिकांचा दबाव यशस्वी ठरला. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पत्रकारांनी रायगडमध्ये रास्ता रोकोही केला होता.
प्रथम चार टप्प्यात होणारे चौपदरीकरणाचे काम आता सहा टप्प्यात एकाचवेळी सुरू होणार.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौपदरीकरण जागेचे सर्वेक्षण पूर्ण. भूसंपादनासाठी प्राथमिक प्रक्रियेला वेग.
जागा मालकांच्या शेकडो हरकती प्रशासनाकडे दाखल, सुनावणीही पूर्ण.
चौपदरीकरणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८९ गावांची जमीन घेतली जाणार.
४जमीनमालकांना सहापट भरपाईचे सरकारचे आश्वासन. माजी खासदार नीलेश राणेंनीही जमीनमालकांच्या अधिक भरपाईसाठी आंदोलन केले.
४अनेक बाजारपेठांना चौपदरीकरणाची झळ बसणार.
४बाजारपेठा वाचविण्यासाठी पर्यायी मार्गाचा पर्याय देणार. पाली, लांजा, चिपळूण बाजारपेठांबाबत अद्याप निर्णय नाही.
४चौपदरीकरणात येणारी धार्मिक प्रार्थना स्थळे वाचविण्याचे प्रयत्न.
४चौपदरीकरण जागेतील वन विभागाची ३४,०६५ झाडे तोडावी लागणार.

Web Title: Nitin Gadkari's all-party googly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.