नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती सोहळ्याची तयारी जोमात
By admin | Published: May 23, 2017 03:24 AM2017-05-23T03:24:04+5:302017-05-23T03:24:04+5:30
भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गडकरी हे २७ मे रोजी ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त कस्तूरचंद पार्कवर त्यांचा भव्य सत्कार होणार असून त्यात सर्वपक्षीय नेते व देशातील विविध क्षेत्रातील नामवंत सहभागी होणार आहेत.
गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आध्यात्मिक संत श्री श्री रविशंकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, भाजपाचे राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी, सिने कलावंत आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नितीन गडकरी षष्ट्यब्दीपूर्ती गौरव समारोह समितीचे कार्याध्यक्ष आहेत. ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे संयोजक व वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी हे सहसंयोजक आहेत.
सुरुवातीला गडकरी यांचा स्थानिक स्तरावर सत्कार करण्याचा निर्णय नागपुरातील नेत्यांनी घेतला होता. मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावण्यात येणार होते. संबंधित नेते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले. तेव्हा फडणवीस म्हणाले, नितीन गडकरी हे आपल्या सर्वांचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा वाढदिवस हा स्थानिक स्तरावर न होता, तो भव्यदिव्य असाच झाला पाहिजे. त्या कार्यक्रमाला मी प्रमुख अतिथी म्हणून नव्हे तर आयोजकाच्या भूमिकेत राहील, असेही त्यांनी सांगितले. त्यातून सोहळ््याची रूपरेषा ठरली.