‘राज्याचे सिंचन क्षेत्र २ वर्षांत ४० टक्क्यांवर’, नितीन गडकरी यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 04:45 AM2017-09-19T04:45:53+5:302017-09-19T04:45:55+5:30
राज्यातील २६ सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे दोन वर्षांत महाराष्ट्राचे सिंचन क्षेत्र २२ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी व्यक्त केला.
मुंबई : राज्यातील २६ सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे दोन वर्षांत महाराष्ट्राचे सिंचन क्षेत्र २२ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी व्यक्त केला.
फिक्कीच्या ‘प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र-२०१७’ या कार्यक्रमात पायाभूत सोईसुविधांची सद्यस्थिती आणि त्यांचा राज्याच्या विकासावर होणारा परिणाम, या विषयावर गडकरी यांनी भाष्य केले. पायाभूत सोईसुविधांच्या बाबतीत येत्या दोन वर्षांत महाराष्ट्राचा चेहरामोहराच बदललेला असेल. महाराष्ट्रातील रस्त्यांचे जाळे तिपटीने वाढल्याचे सांगून गडकरी म्हणाले की, केंद्र सरकारच्या सागरमाला, देशांतर्गत जलवाहतूक, महामार्गांचे चौपदरीकरण, बंदरविकास आदी उपक्रमांमुळे राज्याच्या आर्थिक विकासाची गती वाढेल. मुंबईतून क्रुझ सेवेला सुरुवात झाली आहे. येत्या पाच वर्षांत सुमारे ९५० क्रुझ मुंबईच्या किना-यावर येतील. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पायाभूत सेवासुविधांची गती वाढेल, असे गडकरी म्हणाले.
तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, फिक्कीच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्रात उद्योग वाढीसाठी चांगल्या सोईसुविधा व कुशल मनुष्यबळ आहे. गेल्या तीन वर्षांपासून संपूर्ण देशामध्ये उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. तसेच तीन वर्षांपासून ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’ राबवीत आहोत. महाराष्ट्राच्या उद्योग भरारीची जागतिक बँक आणि नीति आयोगानेही दखल घेत, कौतुक केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.