शिवसेनेच्या दहशतीमुळे राष्ट्रीय मार्गांची कामे बंद करण्याची वेळ, नितीन गडकरींचा लेटरबॉम्ब, लक्ष घालण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By यदू जोशी | Published: August 15, 2021 06:10 AM2021-08-15T06:10:17+5:302021-08-15T08:10:56+5:30
Nitin Gadkari : गडकरी यांनी वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते कशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये अडथळे आणत आहेत याकडे या पत्रात लक्ष वेधले आहे
- यदु जोशी
मुंबई : राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू असताना शिवसेनेचे कार्यकर्ते हे कंत्राटदारांच्या यंत्रसामुग्रीची जाळपोळ करून अधिकारी, कर्मचारी-कामगारांमध्ये दहशत निर्माण करीत काम बंद पाडत आहेत. हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाची कामे मंजूर करण्यासंदर्भात आमच्या मंत्रालयाला गांभीर्याने विचार करावा लागेल, असा स्पष्ट इशारा देणारे पत्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले.
गडकरी यांनी वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते कशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये अडथळे आणत आहेत याकडे या पत्रात लक्ष वेधले आहे. हे लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरू ठेवावीत किंवा कसे याबद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करीत आहे, असे पत्रात म्हटले आहे.
तर गांभीर्याने विचार करावा लागेल
हे असेच चालत राहिले तर केवळ वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयास गांभीर्याने विचार करावा लागेल. ही कामे ‘डिस्कोप’ केली तर आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरू. तसे झाले तर महाराष्ट्राचा नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण कृपया यातून मार्ग काढावा, असे गडकरी यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
ऑडिओ-व्हिडीओ क्लिप व्हायरल
या लेटरबॉम्बच्या बातमीनंतर वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे करणारे अधिकारी, कंत्राटदार यांना धमकावले जात असल्याच्या ऑडिओ-व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत.
वाशिम जिल्ह्यातील धमकी सत्राच्या चौकशीचे गृह विभागाचे आदेश
- नितीन गडकरी यांनी पाठविलेल्या पत्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी गृह विभागाला दिल्याची माहिती आहे.
- गृह विभागाने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना १३ ऑगस्टला एक पत्र पाठवून वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी अडथळे आणत आहेत, विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना भंडावून सोडत आहेत व त्यांनी न ऐकल्यास काम बंद पाडत आहेत.
- या गडकरी यांच्या तक्रारीबाबत पोलीस महासंचालकांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. कंत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारी, या तक्रारींवरून लोकप्रतिनिधींवर काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत का? याची माहितीही गृह विभागाने मागविली आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी
लोकमत डॉट कॉमने शनिवारी सकाळीच गडकरी यांच्या पत्राची ब्रेकिंग न्यूज दिल्यानंतर खळबळ माजली आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.