नितीश कुमार महाराष्ट्राच्या राजकारणात, कपिल पाटील यांच्याकडे सूत्रे
By admin | Published: February 7, 2017 06:51 AM2017-02-07T06:51:33+5:302017-02-07T09:33:05+5:30
बिहारच्या राजकारणातील चाणक्य मानले जाणारे नितीश कुमार लवकरच आपला पक्ष जनता दल युनायटेड (जदयु) चा विस्तार महाराष्ट्रात करणार आहेत
नामदेव कुंभार
मुंबई, दि. 7 - बिहारच्या राजकारणातील चाणक्य मानले जाणारे नितीश कुमार लवकरच आपला पक्ष जनता दल युनायटेड (जदयु) चा विस्तार महाराष्ट्रात करणार आहेत. मुंबई शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी लोकभारती पक्षाचे जदयुमध्ये विलीनिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. जदयुमध्ये लोकभारती पक्षाचे विलीनीकरण कार्यक्रमास स्वत: नितिश कुमार महाराष्ट्रात येणार आहेत.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकभारती पक्षाचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी काही दिग्गज नेत्यांसह पाटण्यातल्या मुख्यमंत्री निवासस्थानी जाऊन नितीश कुमारांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी पक्ष विलीनीकरणाचा निर्णय घेतला. याची औपचारिक घोषणा ११ फेब्रुवारीला रविंद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत होणार आहे. या बैठकीत बिहारचे काही ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज साहित्यिक, लेखक, पत्रकार, शिक्षणक्षेत्राशी संबंधित मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आमदार कपिल पाटील यांचे शिक्षण क्षेत्रावरचे काम पाहता व विधानपरिषदेतील लढवय्या आमदार म्हणून त्यांच्याकडे संपुर्ण महाराष्ट्र पाहतो. जदयुची महाराष्ट्रातील सर्व सुत्रे कपिल पाटील यांच्याकडे जाणार आहेत. कपिल पाटील यांच्या रुपाने जदयुला महाराष्ट्रात कणखर नेतृत्व मिळाले आहे. यामुळे महाराष्ट्रात जनता दलाच्या रूपात नवीन पर्याय उभा राहण्याची शक्यता आहे. जदयुमध्ये त्यांच्या जाण्याने भविष्यात एक नविन पर्याय महाराष्ट्रात उभा राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
नीतीश कुमार कुठल्या मोठ्या जाती समूहातले नाहीत. जातीची व्होट बँक त्यांच्या मागे नाही. ते ज्या कुणबी (कुर्मी) समाजातले आहेत तो समाज फक्त 3टक्के आहे. मात्र विचाराने पक्के लोहियावादी, समाजवादी असलेले नीतीशकुमार आज बिहारचे सर्वमान्य नेता आहेत.