मातोश्रीवर जेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे पीडितांसाठी वेळ नाही - नितेश राणेंची टीका
By admin | Published: July 18, 2016 08:52 PM2016-07-18T20:52:36+5:302016-07-18T20:52:36+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील बलात्कार व हत्येची घटना अत्यंत निर्घृण व माणुसकीला काळिमा फासणारी आहे. मात्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.१८ - अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील बलात्कार व हत्येची घटना अत्यंत निर्घृण व माणुसकीला काळिमा फासणारी आहे. मात्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर जेवण्यासाठी वेळ
असलेल्या मुख्यमंत्र्यांजवळ या घटनेतील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी वेळ नसल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
राणे म्हणाले की, विधानसभेत चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव दिल्यावरही मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चर्चा करण्याऐवजी केवळ निवेदन करत चर्चा टाळली. यावरुन सरकार याप्रकरणी किती गंभीर आहे? हे स्पष्ट होते. मंगळवारी पुन्हा याप्रकरणी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडू, असेही राणे यांनी सांगितले.
सोशल मीडिया वर टीका सुरु झाल्यानंतर या प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांना पाठवण्यात आले. गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणीही राणे यांनी केली आहे. मुलीला न्याय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. शिवाय मुलीला न्याय मिळवून देईपर्यंत याप्रकरणी आवाज उठवू, असेही त्यांनी सांगितले.