निविदांना अखेर सापडला मुहूर्त
By admin | Published: May 19, 2016 02:07 AM2016-05-19T02:07:56+5:302016-05-19T02:07:56+5:30
विविध प्रभागांतील रखडलेल्या विविध विकासकामांच्या सुधारित निविदा सूचना बोर्डाच्या प्रशासनाने बुधवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध केल्या
देहूरोड : बोर्डाच्या हद्दीतील देहूरोड बाजारपेठेसह विविध प्रभागांतील रखडलेल्या विविध विकासकामांच्या सुधारित निविदा सूचना बोर्डाच्या प्रशासनाने बुधवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध केल्या आहेत.
त्यानुसार रस्ते व गटारी दुरुस्ती व सुधारणा, सिमेंट रस्ते, जलवाहिन्या दुरुस्ती व देखभाल, शाळा इमारती, रुग्णालय व बोर्डाच्या विविध इमारती दुरुस्ती, तसेच पथदिवे व्यवस्था चालविणे, देखभाल कामांसाठी साडेचार कोटींहून अधिक रकमेची तरतूद करण्यात आली आहे. पुढील वर्षी १५ मार्चपर्यंत कामे पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. बोर्डाचे सदस्य विशाल खंडेलवाल यांनी गेल्या शुक्रवारी निविदा प्रक्रिया सुरू करण्याबाबत उपोषण केले होते. उपोषणाला बोर्ड उपाध्यक्षांसह भाजपाचे सदस्य तसेच विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता.
बोर्डाच्या स्थापत्य विभागाकडून देहूरोड बाजारपेठेतील विविध गटारी, तसेच वर्दळीच्या दुरवस्था झालेल्या विविध रस्त्यांसह अन्य काही प्रभागांतील रस्त्यांचे डांबरीकरण, रस्ते दुरुस्ती व सुधारणा, गटारी दुरुस्ती व सुधारणा, रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे, घनकचरा व्यवस्थापन करणे आदी कामांच्या सुमारे अडीच कोटींहून अधिक रकमेची तरतूद असलेल्या निविदा गत आर्थिक वर्षात प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, सदर इ निविदा सूचनांना त्या वेळी संबंधित ठेकेदारांनी अत्यल्प प्रतिसाद दिला होता. तर काही कामांच्या निविदाच भरल्या नव्हत्या. त्यामुळे
तीन महिन्यांपूर्वी झालेल्या
बोर्डाच्या विशेष बैठकीत सुमारे अडीच कोटींच्या विकासकामांच्या फेरनिविदा काढण्याचा निर्णय झाला होता. प्रशासनाने पुन्हा कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या नव्हत्या.(वार्ताहर)
>बुधवारी प्रशासनाने सुधारित निविदा सूचना प्रसिद्ध केल्या असून, यात बोर्डाच्या हद्दीतील रस्ते दुरुस्ती व सुधारणा कामांसाठी एक कोटी ५५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. गटारी दुरुस्ती व सुधारणा करण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.