‘निवार’ तीव्र चक्रीवादळ बुधवारी सायंकाळी धडकणार; 'या' राज्यांना हवामान विभागाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 08:34 PM2020-11-24T20:34:47+5:302020-11-24T20:49:15+5:30

‘निवार’ चक्रीवादळ बुधवारी सायंकाळी तामिळनाडुतील कराईकल आणि पाँडेचरीमधील ममल्लापूरम दरम्यान किनारपट्टीला धडकणार

‘Niwar’ cyclone will hit the area on Wednesday evening; Meteorological Department warns 'these' states | ‘निवार’ तीव्र चक्रीवादळ बुधवारी सायंकाळी धडकणार; 'या' राज्यांना हवामान विभागाचा इशारा

‘निवार’ तीव्र चक्रीवादळ बुधवारी सायंकाळी धडकणार; 'या' राज्यांना हवामान विभागाचा इशारा

Next
ठळक मुद्देसांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबांद, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात २६ नोव्हेंबरला पावसाची शक्यता राज्यात मंगळवारी सर्वात कमी किमान तापमान गोंदिया, ११.६ अंश सेल्सिअस

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘निवार’ चक्रीवादळाचे रूपांतर मंगळवारी सायंकाळी तीव्र चक्रीवादळात झाले असून ते बुधवारी सायंकाळी तामिळनाडुतील कराईकल आणि पाँडेचरीमधील ममल्लापूरम दरम्यान किनारपट्टीला धडकणार आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही होणार असून २५ ते २७ नोव्हेंबरला विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागरातील ‘निवार’ चक्रीवादळ मंंगळवारी दुपारी चेन्नईपासून ४५० किमी आणि पाँडेचरीपासून ४१० किमी दूर होते़ हे चक्रीवादळ किनारपट्टीला धडकेल, त्यावेळी वारे ताशी १०० ते ११० किमी वेगाने वाहण्याची शक्यता आहे. याचा परिणाम गुरुवारी सकाळपर्यंत जाणवणार असून त्यानंतर ते शांत होईल. आंध्र प्रदेश किनारपट्टी, तामिळनाडु, पाँडेचरी, तेलंगणा, दक्षिण कर्नाटकात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

राज्यात मंगळवारी सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ११.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्राच्या बहुताश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या तुरळक भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. 

विदर्भातील भंडारा जिल्ह्यात २५ व २६ नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे़ चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात २५ ते २७ नोव्हेंबर तसेच वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात २६ व २७ नोव्हेंबर रोजी वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे़ गोंदिया, वर्धा, नागपूर, बुलढाणा, अमरावती, अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबांद, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात २६ नोव्हेंबरला पावसाची शक्यता आहे.

Web Title: ‘Niwar’ cyclone will hit the area on Wednesday evening; Meteorological Department warns 'these' states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.