माहिती नाकारल्याने महापालिकेला दंड
By admin | Published: June 13, 2016 02:47 AM2016-06-13T02:47:38+5:302016-06-13T02:47:38+5:30
अनधिकृत बांधकामांची माहिती न दिल्याने अपीलकर्ता योगेश केणी यांना महापालिकेकडून पाच हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात आली
मुंबई : माहिती अधिकाराऱ्या अंतर्गत दोन वेळा अपील करूनही महापालिकेच्या पी/ उत्तर विभागाच्या हद्दीतील पाडण्यात आलेली अनधिकृत बांधकामांची माहिती न दिल्याने अपीलकर्ता योगेश केणी यांना महापालिकेकडून पाच हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे. महापालिकेचे कनिष्ठ अभियंते कुबेर शिंदे यांच्या पगारातून ही रक्कम देण्यात यावी, असे आदेश राज्य मुख्य माहिती आयुक्तांनी दिले होते.
मालाड येथील योगेश केणी यांनी ९ जुलै २0१५ रोजी जन माहिती अधिकाऱ्याकडे अर्ज करून पी/उत्तर विभागात पाडण्यात आलेल्या बांधकामांच्या नोंदी मागितल्या होत्या. मात्र ठरलेल्या मुदतीत माहिती न मिळाल्याने त्यांनी पहिले अपील दाखल केले. १४ आॅक्टोबर रोजी प्रथम अपिलिय अधिकाऱ्यांना योग्य ते शुल्क आकारून केणी यांना सात दिवसांत माहिती देण्यात यावी, असे आदेश दिले.
त्यानुसार माहिती मिळवण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया केणी यांनी पार पाडली, तरीही माहिती देण्यात न आल्याने केणी यांनी १२ जानेवारी २0१६ रोजी दुसरे अपील दाखल केले. सुनावणीत कनिष्ठ अभियंता कुबेर शिंदे यांच्या बेजबाबदारपणामुळे केणी यांना माहिती न मिळाल्याचे स्पष्ट झाले. ही बाब अत्यंत गंभीर असून जन माहिती अधिकाऱ्याने या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले असून, कमालीचा बेजबाबदारपणा दाखविल्याचा ठपका ठेवत नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार अलीकडेच महापालिकेने पाच हजार रुपयांचा धनादेश केणी यांना दिला. (प्रतिनिधी)