१०वी, १२वीला शिष्यवृत्ती नाही
By admin | Published: June 24, 2016 05:22 AM2016-06-24T05:22:45+5:302016-06-24T05:22:45+5:30
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर डॉ. अब्दुल कलाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे १०वी, १२वीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केल्याचे वृत्त वाऱ्यासारखे फिरत आहे
ठाणे : शासनाकडून प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना शिकता यावे, यासाठी विविध शिष्यवृत्त्यांच्या योजना सुरू केल्या आहेत, परंतु मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर डॉ. अब्दुल कलाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे १०वी, १२वीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केल्याचे वृत्त वाऱ्यासारखे फिरत आहे. आता त्याचा त्रास ठाणे जिल्हा परिषद आणि ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाला सहन करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षात अशा प्रकारच्या कोणत्याही योजना नसल्याची माहिती या दोन्ही विभागांनी दिली आहे, परंतु या शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, म्हणून विद्यार्थ्यांचे पालक मात्र, शिक्षण विभागात फेऱ्या मारत आहेत.
सध्या शासनाकडून इयत्ता ४थी आणि सातवीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या योजना सुरू आहेत, परंतु मागील काही दिवसांपासून माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाने १०वी, १२वीतील यशस्वी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केल्याची माहिती व्हॉट्स अॅप या सोशल मीडियावरून वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आहे. विशेष म्हणजे, या योजनेच्या फॉर्मचे वाटप १५ जूनपासून शिक्षण विभाग, झेडपी आदी ठिकाणी सुरू केल्याची माहितीदेखील फिरू लागली आहे. तिचा लाभ आपल्या पाल्याला व्हावा, म्हणून विद्यार्थ्यांचे पालक महापालिका शाळा, महापालिका मुख्यालयातील शिक्षण विभागाचे कार्यालय आणि झेडपीच्या शिक्षण विभाग तथा समाज कल्याण विभागात फेऱ्या मारत आहेत, परंतु अशा प्रकारची कोणतीच योजना सुरू नसल्याची माहिती या पालकांना मिळत आहे.
जर अशी योजनाच नाही, तर मग याची माहिती सोशल मीडियावर कशी पोहोचली, असा सवाल मात्र, हे विभाग उपस्थित करू लागले आहेत. (प्र्रतिनिधी)