आराेप सिद्ध हाेईपर्यंत संजय राठाेड यांच्यावर कारवाई नको, बंजारा समाजाच्या महंतांच्या बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 05:48 AM2021-02-19T05:48:44+5:302021-02-19T05:49:13+5:30
sanjay rathod : महंत बाबुसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत संजय महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत पाेहरादेवी येथे पाेहरादेवी विकासकामांसह संजय राठाेड, पूजा चव्हाण प्रकरणाची चर्चा करण्यात आली.
वाशिम : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये वनमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय राठाेड यांच्यावर होत असलेले आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांच्यावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई करू नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्याचा निर्णय गुरुवारी पोहरादेवी येथे पार पडलेल्या बंजारा समाजाच्या महंतांच्या बैठकीत घेण्यात आला.
महंत बाबुसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत संजय महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत पाेहरादेवी येथे पाेहरादेवी विकासकामांसह संजय राठाेड, पूजा चव्हाण प्रकरणाची चर्चा करण्यात आली. यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील ४ गावांसह वाशिम जिल्ह्यातील नायक कारभारी उपस्थित हाेते. पाेहरादेवी येथील नंगारा वास्तु विकासासंदर्भात चर्चा केल्यानंतर पूजा चव्हाण प्रकरणावर चर्चा झाली.
या प्रकरणात संजय राठोड यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होताना दिसून येत असून, राठोड यांच्यावर होत असलेले आरोप सिद्ध होईपर्यंत, त्यांच्यावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई करू नये, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्याचे ठरविण्यात आले.
मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार - कबिरदास महाराज
पूजा चव्हाण प्रकरणात महंत व बंजारा समाजाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविणार असल्याची माहिती देवी सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष कबिरदास महाराज यांनी दिली.