पंधरा दिवसांत चालकांवर कारवाई होणार नाही
By admin | Published: July 28, 2016 01:16 AM2016-07-28T01:16:54+5:302016-07-28T01:16:54+5:30
‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ची अंमलबजावणी मुंबईतील पेट्रोल पंपांवर १ आॅगस्टपासून केली जाणार आहे. यात पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यास येणाऱ्या चालकांनी हेल्मेट घातले नसले तर वाहतूक
मुंबई : ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ची अंमलबजावणी मुंबईतील पेट्रोल पंपांवर १ आॅगस्टपासून केली जाणार आहे. यात पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यास येणाऱ्या चालकांनी हेल्मेट घातले नसले तर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाणार होती. मात्र सुरुवातीच्या पंधरा दिवसांत कोणतीही कारवाई न करता हेल्मेटसंदर्भात जनजागृती केली जाईल, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.
हेल्मेटसक्तीबाबत दुचाकीस्वारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने परिवहन विभागाकडून ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’चा नियम काढण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी १ आॅगस्टपासून करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात वाहतूक सहपोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी सांगितले की, मुंबईत २२३ पेट्रोल पंप असून त्या प्रत्येक पेट्रोल पंपावर एक पोलीस तैनात केला जाईल. मात्र सुरुवातीला चालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेटबाबतचे महत्त्व पटवून देण्यात येईल.
सुरुवातीला पंधरा दिवस जनजागृती केली जाईल आणि त्यानंतरही दुर्लक्ष केल्यास दुचाकीस्वारांवर कारवाई केली जाईल. वाहतूक पोलीस हे सकाळपासून पेट्रोल पंपावर तैनात केले जातील. मात्र रात्रीच्या वेळी ते तैनात केले जाणार नसल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)