उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 08:04 PM2024-10-14T20:04:11+5:302024-10-14T20:04:58+5:30
Uddhav Thackeray Health Update: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सकाळी एचएन रिलायन्स रुग्णालयात गेले होते. त्यांच्यावर 'अँजिऑप्लास्टी' म्हटले जात होते. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी याबद्दल माहिती दिली.
Uddhav Thackeray Aaditya Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी (१४ ऑक्टोबर) रुग्णालयात गेले होते. त्यांच्यावर अँजिऑप्लास्टी करण्यात आल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले. त्यामुळे शिवसैनिक आणि राजकीय वर्तुळातून चिंता व्यक्त करण्यात आली. पण, आदित्य ठाकरे यांनी या वृत्तात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांना पूर्व नियोजित आणि नियमित तपासण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली.
"उद्धव ठाकरे यांची आज सकाळी सर एचएन रिलायन्स रुग्णालयात पूर्व नियोजित तपासणी झाली. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळे सर्व काही ठिक आहे आणि ते कामावर परतण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यास पूर्णपणे तयार आहेत", अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.
This morning, Uddhav Thackeray ji did a pre planned detailed check up at the Sir HN Reliance Hospital.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 14, 2024
With your best wishes, All is well, and he is fully ready to get to work and serve the people.
तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंवर झाली होती शस्त्रक्रिया
उद्धव ठाकरेंना तीन वर्षांपूर्वी मानेचा त्रास सुरू झाला होता. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सर एचएन रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सर्व्हायकल स्पाईनशी संबंधी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंची फिजिओथेरेपी झाली आणि त्यांची प्रकृती चांगली झाली होती. उद्धव ठाकरे सध्या राजकारणात पूर्णपणे सक्रिय आहेत.