लिओनार्डोसोबत भेटीचे नियोजन नाही : सरसंघचालकांची स्पष्टोक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2016 10:00 PM2016-06-23T22:00:34+5:302016-06-23T22:00:34+5:30
एचएसएसतर्फे २९ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत हर्टफोर्डशायर येथे संस्कृती या महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 23 - आॅस्कर विजेता अभिनेता लिओनार्डो दिकॅप्रिओ याच्यासोबत भेटीचे कुठलेही नियोजन नसल्याची स्पष्टोक्ती खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केली आहे. आॅस्कर विजेते लिओनार्डो दिकॅप्रिओ आणि इंग्लंड उद्योगपती रिचर्ड ब्रँनसन यांनी मोहन भागवतांना भेटीसाठी विशेष निमंत्रण दिलं असल्याचे वृत्त प्रसिद्धीमाध्यमांमध्ये आले. त्यावर विचारणा केली असता डॉ.भागवत यांनी ही स्पष्टोक्ती केली.
विदेशांमध्ये संघाचे काम एचएसएस (हिंदू स्वयंसेवक संघ) या नावाने चालते. युनायटेड किंगडम येथील एचएसएसतर्फे २९ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत हर्टफोर्डशायर येथे संस्कृती या महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात डॉ.भागवत उपस्थित राहणार आहेत. मी शिबीरात उपस्थित होण्यासाठी जाणार आहे. तेथे संघ स्वयंसेवकांशी संवाद साधणार आहे. संघाच्या शिबीरात लिओनार्डो दिकॅप्रिओसारख्या अभिनेत्याचे काम काय राहणार आहे, असा प्रश्न त्यांनी केला. जर लिओनार्डो भेट घेण्यास आला तर नक्की भेट घेईल. परंतु अद्याप अशा भेटीचे काही नियोजन झालेले नाही, असे डॉ.भागवत यांनी स्पष्ट केले.