१ ऑक्टोबरपर्यंत ‘त्या’ १२ आमदारांची नियुक्ती नाही, याचिकेवरील सुनावणी १ ऑक्टोबरपर्यंत तहकूब
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 06:00 AM2024-08-24T06:00:35+5:302024-08-24T06:00:54+5:30
याचिकाकर्ते ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांच्या वकिलांनी पुढील सुनावणी होईपर्यंत १२ आमदारांची नियुक्ती न करण्याचा आदेश सरकारला देण्याची विनंती केली.
मुंबई : राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांची नियुक्ती आणखी काही काळ रखडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी १ ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
याचिकाकर्ते ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांच्या वकिलांनी पुढील सुनावणी होईपर्यंत १२ आमदारांची नियुक्ती न करण्याचा आदेश सरकारला देण्याची विनंती केली. सरकारने जे गेल्या दोन वर्षांत केले नाही, ते आता लगेच करणार नाही, असा टोला मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने हाणला.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने या याचिकेत आता काही उरले नसल्याचेही म्हटले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना यादी देण्यात आली होती.
कोश्यारी यांनी या नियुक्त्या केल्या नाहीत. याबाबत मोदी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. मविआ सरकारने १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्यपालांना शिफारस केली होती. मात्र, तत्कालीन राज्यपालांनी ती यादी मंजूर केली नव्हती.