वैयक्तिक फटाके उडविण्यास नाही बंदी, सार्वजनिक कार्यक्रमांनाच बंधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 02:57 AM2018-11-06T02:57:10+5:302018-11-06T02:57:23+5:30
सर्वोच्च न्यायालयाने फटाके उडविण्याबाबत जो निर्णय दिला आहे़ त्यात सार्वजनिक कार्यक्रमात जर फटाके उडवायचे असेल तर त्यासाठी रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत दोन तासांची मुभा दिली आहे.
पुणे - सर्वोच्च न्यायालयाने फटाके उडविण्याबाबत जो निर्णय दिला आहे़ त्यात सार्वजनिक कार्यक्रमात जर फटाके उडवायचे असेल तर त्यासाठी रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत दोन तासांची मुभा दिली आहे़ सर्वसामान्य नागरिक रात्री १० ते सकाळी ६ या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी सुरक्षितपणे आपल्या घराच्या आवारात फटाके उडवू शकतो, असे सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी सांगितले़
सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके उडविता येणार असल्याचे सांगितले जाते़ त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
याबाबत सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी सांगितले, की मुंबईत सोमवारी गृह विभागाची बैठक होती़ त्यात काही वेगळा आदेश असेल तर त्याची माहिती उद्या दिली जाईल़ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार फक्त सार्वजनिक कार्यक्रमात फटाके उडवायचे असतील तर हे वेळेचे बंधन आहे़ यापूर्वी शहर पोलीस दलाच्या आदेशात १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या फटाक्यांच्या विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे़ ही बंदी ४ ते १० नोव्हेंबरदरम्यान घालण्यात आली आहे़ तसेच आकाशात पेटते आकाशकंदील सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे़