नो सेलिब्रेशन ओन्ली कम्युनिकेशन
By Admin | Published: November 1, 2016 04:14 AM2016-11-01T04:14:22+5:302016-11-01T04:14:22+5:30
वर्षपूर्ती हे काही ‘सेलिब्रेशन’ नसते. त्यामुळे सरकारला दोन वर्षे झाली
नागपूर : वर्षपूर्ती हे काही ‘सेलिब्रेशन’ नसते. त्यामुळे सरकारला दोन वर्षे झाली, त्याचे ‘सेलिब्रेशन’ न करता ‘कम्युनिकेशन’वर भर द्या. लोकांशी संवाद साधता येतील, असे कार्यक्रम घ्या. आजवर जितकी कामे झाली नसतील तितकी कामे केंद्र व राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात केली आहेत. सरकारने केलेली ही कामे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त शहर भाजपातर्फे सोमवारी शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे व महापौर प्रवीण दटके यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. तसेच केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. अजय संचेती, खा. डॉ. विकास महात्मे प्रमुख अतिथी होते. आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. अनिल बोंडे, आ. अनिल सोले, उपमहापौर सतीश होले, अर्चना डेहणकर, विश्वास पाठक, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत, मनपा सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, सुभाष पारधी व्यासपीठावर होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या दोन वर्षात देशात सर्वाधिक गुंतवणूक (एफडीआय) आणि रोजगार निर्मिती महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा त्याचे वैभव प्राप्त करून देण्याचे कार्य केले जात आहे. नीती आयोगाने सादर केलेल्या एका रिपोर्टनुसार शेतीपणनमध्ये महाराष्ट्राला पहिला क्रमांक देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छतेच्या आवाहनानुसार गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील नऊ हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.
देशातील पहिल्या दहा जिल्ह्यांपैकी पाच जिल्हे हे महराष्ट्रातील आहेत. देशातील एकूण ११८ पैकी ५२ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. जनधन योजनेत सर्वाधिक खाते महाराष्ट्रात उघडण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र काम केले जात आहे. डिजिटलायझेशन केले जात आहे.