पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन नका- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 06:00 AM2020-04-21T06:00:11+5:302020-04-21T06:00:44+5:30
सीआयडीचे डीजीच्या नेतृत्वात तपास
मुंबई: पालघर जिल्ह्यात तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून यातील प्रमुख ५ हल्लेखोर आणि सुमारे १०० जणांना पकडले असून गुन्हा अन्वेषण विभाग विभागाचे महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वात कसून तपास सुरू आहे. मृतांमध्ये दोन साधू होते; मात्र याला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
सध्या आम्ही कोरोनाचे युद्ध नेटाने लढत आहोत. काही जण या घटनेवरून वातावरण तापवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी याविषयी गृहमंत्री अमित शहा यांना सकाळी दूरध्वनीवरून बोलून सर्व कल्पना दिली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. १६ तारखेस कासा पोलीस ठाणे हद्दीत ज्या ठिकाणी हा घृणास्पद प्रकार घडला तेथून अवघे काही मीटर अंतरावर दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची सीमा सुरु होते. पोलिसांवरदेखील जमावाने हल्ला केला. हा हल्ला गेल्या काही दिवसांपासून त्या भागात पसरलेल्या अफवेमुळे गैरसमजुतीने झाला. हा भाग पालघर पासून ११० किमी अंतरावर आहे. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी अतिशय तातडीने याठिकाणी धाव घेतली.
दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा याप्रकरणी निलंबितही केले
आहे. गृहमंत्री अमित शहा त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही बोलणे झाले आहे. इथे कुठलाही धार्मिक संदर्भ नाही. तसेच जातीय वळण देणे अतिशय चुकीचे आहे असे आपण त्यांना सांगितले. शहा यांचेही तेच मत होते.
- मुख्यमंत्री