छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 'नो कॉम्प्रमाईज'; संभाजीराजे छत्रपती पोहोचले थेट बेळगावात!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 03:51 PM2022-12-18T15:51:54+5:302022-12-18T15:53:48+5:30
आज साडेतीनशे हे वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांच्या नसा नसात भिनले आहेत.
आज साडेतीनशे हे वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांच्या नसा नसात भिनले आहेत. आपल्या जीवनात शिवरायांना स्मरण केल्याशिवाय आपण पुढेच जाऊ शकत नाही. बाकीच्यांसाठी कॉम्प्रोमाइज पण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी नो कॉम्प्रमाईज! कारण ते आपले दैवत आहेत, असे उद्गार कोल्हापूरचे माजी खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी काढले.
होनगा (ता. जि. बेळगाव) येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आज रविवारी सकाळी आयोजित अनावरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सतीश जारकीहोळी हे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अविस्मरणीय प्रसंग आहे असे सांगून युवराज संभाजीराजे पुढे म्हणाले शिवाजी महाराजांचा आपलं राज्य स्वराज्य नाही सुराज्य व्हावं असा संकल्प होता. महाराजांचे आचार विचार आचरणात आणणे ही काळाची गरज आहे. महाराज जसे आत्मचिंतन करत असे आपण केले पाहिजे ही सर्व शिवभक्तांची जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसे स्थापन केले, परकियांना कसे परतावून लावले, अफजलखानाचा वध कसा केला अशी अनेक उदाहरणे मी देऊ शकतो. मात्र हा कार्यक्रम कर्नाटकात होत आहे म्हणून मी मुद्दाम सर्वांना महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाचे एक आठवण सांगतो. जेंव्हा छ. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले. दक्षिण दिग्विजय हा फक्त कर्नाटक नव्हे तर खाली थेट तामिळनाडू -जिंजी पर्यंत होता. जेंव्हा छ. संभाजी महाराज मारले गेले. तेंव्हा मराठा साम्राज्य 8 ते 9 वर्षे शिवरायांचे पुत्र छ. राजाराम महाराज यांनी जिंजी येथून चालविले. त्यामुळे छ. शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते तर देशभर त्यांचे कार्यक्षेत्र होते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही, असे ते म्हणाले.
आज महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास बोलावून तुम्ही युवराज संभाजी राजांचा यांचा नव्हे तर छ. शिवाजी महाराजांच्या घराण्याचा मानसन्मान केला आहे. आज साडेतीनशे वर्ष झाली तरी महाराज आपल्या सर्वांच्या नसानसात दिलेले आहेत. आपल्या जीवनात शिवाजी महाराजांना स्मरण केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. बाकीच्यांसाठी कॉम्प्रमाईज पण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी नो कॉम्प्रमाईज. कारण ते आपले दैवत आहेत असे सांगून मला आनंद आहे की या महिन्यात आपण दोन वेळा कर्नाटकला भेट दिली असल्याचे माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी व्यासपीठावर पंढरपूरचे सद्गुरू विठ्ठल (दादा) वास्कर महाराज, खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर, बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, डॉ. मनोहर पाटील, अभियंता एम. एम. मुतगेकर, मूर्तिकार जे. जे. पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती आणि सद्गुरु वास्कर महाराज यांच्या हस्ते शिवपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करून परिसर दणाणून सोडण्यात आला. सदर अनावरण सोहळ्यास गावातील प्रतिष्ठित नागरिक व मान्यवरांसह होनगा ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, गावातील संस्था व महिला मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.