महाराष्ट्र निवडणूक 2019 : सत्ता स्थापनेबद्दल मोदी, शहांशी चर्चा झाली का?; शरद पवार म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 11:18 AM2019-11-02T11:18:25+5:302019-11-02T11:21:14+5:30
Maharashtra Vidhan Election 2019 : महायुती अन् सत्ता स्थापनेबद्दल शरद पवारांचं मोठं भाकीत
मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटत असला तरीही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. मात्र शिवसेना, भाजपाची गाडी सत्तेच्या वाटपावर अडली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांकडून केल्या जाणाऱ्या दबावाच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस फॅक्टर महत्त्वाचा आहे. आमच्यासमोर इतर पर्याय खुले आहेत म्हणत शिवसेना, भाजपा एकमेकांना अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीची भीती दाखवत आहेत. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य करत दोन्ही पक्षांना धक्का दिला.
आम्हाला शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत माझं बोलणं झालेलं नाही, हे स्पष्ट करत शरद पवारांनी शिवसेनेच्या दाव्यातील हवा काढून घेतली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांसोबत कोणताही संवाद झालेला नाही असं पवार म्हणाले. दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाल्याचं पवारांनी सांगितलं. ते सीएनएन-न्यूज18 वृत्तवाहिनीशी बोलत होते.
आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत. कारण महाराष्ट्रातल्या जनतेनं आम्हाला तसा कौल दिला आहे. त्यामुळे शिवसेना, भाजपा कधी सत्ता स्थापन करणार, याची आम्ही वाट पाहोत, असं म्हणत पवारांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. शिवसेना, भाजपामधल्या सुंदोपसुंदीवरदेखील पवार यांनी भाष्य केलं. शिवसेना नेत्यांच्या विधानावरुन भाजपानं त्यांना सत्तेच्या समान वाटपाबद्दल शब्द दिल्याचं जवळपास स्पष्ट होत आहे. त्यामुळे भाजपानं दिलेला शब्द पाळावा, असं पवार म्हणाले.
भाजपा, शिवसेनेच्या दबावतंत्राबद्दल आणि सत्ता स्थापनेबद्दल पवारांनी मोठं भाकीत केलं. राज्यातील सत्ता स्थापनेचा प्रश्न 10 दिवसांत सुटेल, असं पवार यांनी म्हटलं आहे. पुढील 10 दिवसांत शिवसेना, भाजपा एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असा अंदाज पवारांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्यासाठी भाजपाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावं लागेल, असं पवार म्हणाले.