कोपर्डी प्रकरणाला जातीय रंग नको : प्रकाश आंबेडकर
By Admin | Published: July 22, 2016 01:00 AM2016-07-22T01:00:30+5:302016-07-22T01:00:30+5:30
कोपर्डी प्रकरणातील गुन्हा अत्यंत निषेधार्ह आहे, दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, मात्र त्यावरून जातीय तणाव निर्माण करणे
पुणे : कोपर्डी प्रकरणातील गुन्हा अत्यंत निषेधार्ह आहे, दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, मात्र त्यावरून जातीय तणाव निर्माण करणे, विशिष्ट जातीवर टीका करणे योग्य नाही. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने याबाबत भाष्य करणे गरजेचे आहे, असे मत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
कोपर्डी (ता. कर्जत) येथील पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आंबेडकर निघाले होते. मात्र शिरूर येथे ते पोहोचले असतानाच नगर पोलिसांनी मनाई करणारा हुकूम बजावला. त्याचे कारण विचारले असता पोलिसांनी तुमच्या भेटीला विरोध करण्याचा निर्णय कोपर्डी गावात झाला असल्याची माहिती त्यांना दिली. त्यामुळे पुण्यात येऊन आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘‘कोपर्डी प्रकरणाला जातीय रंग देणे योग्य नाही. सोशल मीडियावरून वारंवार तसे केले जात आहे. पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठीच आपण तिथे जात होतो, मात्र पोलिसांनी मनाई केली. आंबेडकर म्हणाले, ‘‘भाजपाच्या पदाधिकाऱ्याने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्याविषयी काढलेले उद््गार हा भाजपाच्या धोरणाचाच एक भाग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशावरून कोणी कोणाविरुद्ध बोलायचे हे निश्चित केले जात असून, त्यानुसारच हे सुरू आहे. असे कोणी कोणाविरुद्ध बोलायचे हे त्यांच्यात ठरले असल्याचे दिसते आहे. गुजरातमध्ये दलितांवर अत्याचार झाले. तिथे असलेल्या गोरक्षा समितीला संघाचे पाठबळ आहे. मायावतींवर झालेली टीकाही त्यांच्या धोरणाचाच भाग असावा. ’’