कभी हां, कभी ना, मनसेचं काही ठरेना; राज ठाकरेंची बैठक ठोस निर्णयाविना!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 02:31 PM2019-09-13T14:31:25+5:302019-09-13T14:35:19+5:30
विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल मनसेत दूमत
मुंबई: विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल मनसेत दूमत असल्याचं समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आज त्यांच्या निवासस्थानी एक बैठक घेतली. त्यावेळी पक्षाच्या नेत्यांनी आगामी निवडणुकीविषयी त्यांची मतं व्यक्त केली. लवकरच राज ठाकरे निवडणुकीबद्दलची मनसेची भूमिका स्पष्ट करतील, अशी माहिती बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
मनसेनं लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. मात्र राज ठाकरेंनी भाजपाविरोधात जोरदार प्रचार केला होता. मोदी-शहांना देशाच्या राजकीय क्षितिजावरुन दूर करा, असं आवाहन करत राज यांनी राज्यभरात सभा घेतल्या होत्या. त्यामुळेच राज विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज कृष्णकुंजवर मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये काही नेत्यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. तर काहींनी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता निवडणूक लढवू नये, असा सूर आळवला.
लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूकदेखील न लढवल्यास कार्यकर्ते, मतदार पक्षापासून दूर जातील, असं मत काही नेत्यांनी राज यांच्याकडे व्यक्त केलं. पक्षानं निवडणूक लढवल्यास लोकांमध्ये सकारात्मक संदेश जाईल, असं काही नेत्यांनी राज यांनी सांगितलं. तर राज्यातील सध्याची स्थिती, भाजपा-शिवसेनेत होणारं जोरदार इनकमिंग पाहता निवडणूक लढवून पैसा वाया का घालवायचा, अशी भावना काहींनी व्यक्त केली. त्यामुळे आता राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.