संघर्षाशिवाय विकास नाही- डॉ. प्रकाश आमटे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 04:21 AM2018-12-11T04:21:07+5:302018-12-11T04:21:33+5:30
दीनदुबळ्यांच्या समस्या श्रीमंत लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्याशिवाय त्यांना समाजातील परिस्थितीची जाणीव होणार नाही, अशा भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केल्या.
पुणे : समाजाने नाकारलेल्या, झिडकारलेल्या लोकांसाठी बाबांनी काम सुरू केले. संघर्षाशिवाय यश मिळत नाही, हे त्यांच्या कार्यातूनच आम्हाला उमगले आणि नकळत आमच्यावर संस्कार होत गेले. प्रत्येकाला हाव आणि गरज यांतील फरक कळला पाहिजे. हाव असणारा माणूस कधीच समाधानी होऊ शकत नाही. दीनदुबळ्यांच्या समस्या श्रीमंत लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्याशिवाय त्यांना समाजातील परिस्थितीची जाणीव होणार नाही, अशा भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केल्या.
पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते झाले. या वेळी सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, कामगार कल्याण अधिकारी नितीन केंजळे, अध्यक्ष उदय भट, मुक्ता मनोहर, नगरसेविका डॉ. माधुरी सहस्रबुद्धे, कामगार युनियनचे अध्यक्ष डी. एस. देशपांडे, मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आमटे म्हणाले, ‘‘समाजातील प्रत्येकाने ‘कचराकुंडी’ हा माहितीपट पाहावा. त्यातून कामगारांच्या जीवनाची समाजाला कल्पना येईल. मनोहर यांच्यासह अनेकांच्या संघर्षामुळे कामगारांना प्रतिष्ठा मिळाली, हक्क मिळाले. बाबा कामगार युनियनचे उपाध्यक्ष असताना डोक्यावर मैला घेऊन जाण्याऱ्या कामगारांनी वेतनवाढीसाठी संप केला. बाबांनी स्वत: डोक्यावर मैला वाहून नेण्याचे काम करून अनुभव घेतला. कामगारांचे दु:ख त्यांना कळले. एकदा एका समारंभाला ते आपल्यासह मैला वाहून नेणाºया लोकांना घेऊन गेले. लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांना निमंत्रणे येणे बंद झाले. समाजाची ही मानसिकता बदलायला हवी.’’ डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आभार मानले.
आदिवासींची पिळवणूक
सुशिक्षित लोक आदिवासींची पिळवणूक करायचे. त्यांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणारे कोणी नव्हते. अशा वेळी केवळ आरोग्यसेवा न पुरवता त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी काम करण्याचे ठरवले आणि आम्ही केवळ निमित्तमात्र ठरलो. आज आदिवासींची मुले डॉक्टर, वकील झाली आहेत. यातील ८० टक्के लोक परत येऊन आपल्या भागात काम करीत आहेत. या कामाला सुरुवात करून २३ डिसेेंंबरला ४५ वर्षे पूर्ण होतील. एवढ्या वर्षांत जिवाला जीव देणारे कार्यकर्ते मिळाले, कमालीचे समाधान मिळाले.
- डॉ. प्रकाश आमटे
...तरीही काम करीत राहिले
महारोगी कुटुंब, समाजाकडून नाकारले जातात. बाबा आमटेंनी त्यांच्या सेवेचे व्रत घेतले. ते अनुभवताना त्यांना समाजाकडून वाईट अनुभव आले, तरीही ते काम करीत राहिले. दुसरी पिढीही त्याच जोमाने कामाला लागली. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांनी स्वत:ला काय मिळणार, याचा विचार न करता आपले वैद्यकीय ज्ञान आदिवासींसाठी कसे उपयोगात येईल, याचा विचार केला. - मुक्ता मनोहर,
सामाजिक कार्यकर्त्या