मुकेश अंबानींसह अन्य संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल होणार नाही
By admin | Published: July 28, 2016 07:38 PM2016-07-28T19:38:35+5:302016-07-28T19:38:35+5:30
रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने नागपुरात मोबाईल टॉवर उभारण्यासाठी व केबल टाकण्यासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदले.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २८ : रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने नागपुरात मोबाईल टॉवर उभारण्यासाठी व केबल टाकण्यासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदले. यापैकी एका पाणी भरलेल्या खड्ड्यात पडल्यामुळे पिंकी सोळंकी या दोन वर्षीय चिमुकलीचा २०१५ मध्ये मृत्यू झाला. याप्रकरणात कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, संचालक मंडळाचे सदस्य महेंद्र नहाटा, मनोज मोदी, आकाश अंबानी, इशा अंबानी व व्यवस्थापकीय संचालक संजय मश्रुवाला यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्याचे निर्देश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नकार दिला. यामुळे अंबानींसह इतर संचालकांना मोठा दिलासा मिळाला.
न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी हा निर्वाळा दिला.
यासंदर्भात शाहबाज अबरार सिद्धीकी यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. या संचालकांसह मनपा अधिकाऱ्यांविरुद्ध भादंविच्या कलम ३०४-अ (निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरणे), ३३६ (इतरांची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात टाकणारी कृती) व ३३७ (इतरांची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात टाकणाऱ्या कृतीमुळे इजा पोहोचणे) अन्वये गुन्हे नोंदविण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती. कंपनीचे संचालक याचिकेत प्रतिवादी होते.
याचिकाकर्त्याने प्रत्येकावर वैयक्तिक व निश्चित आरोप केले नसल्यामुळे याचिकेतून नावे वगळण्याची विनंती करणारा अर्ज संचालकांनी सादर केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. एखाद्या फौजदारी प्रकरणात कंपनी दोषी आढळून आली तरी, कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हे नोंदविता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निवाडा दिला आहे. याप्रकरणात संचालकांविरुद्ध निश्चित आरोप करण्यात आलेले नाहीत. निश्चित आरोपांशिवाय त्यांना दोषी ठरविले जाऊ शकत नाही. यामुळे त्यांना प्रकरणात प्रतिवादी करणे योग्य होणार नाही. त्यांच्याविरुद्ध कोणताही दिलासा याचिकाकर्त्याला देऊ शकत नाही असे स्पष्ट करून न्यायालयाने सर्व संचालकांची नावे याचिकेतून वगळण्याचे निर्देश दिलेत.