लेखक जेम्स लेनचा सर्वात मोठा खुलासा; बाबासाहेब पुरंदरेंवरील आरोपाला वेगळं वळण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 11:08 AM2022-04-17T11:08:21+5:302022-04-17T11:12:54+5:30
बाबासाहेब पुरंदरे यांना सॉफ्ट टार्गेट बनवल्याचा आरोप राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला होता
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात आणि त्यानंतर केलेल्या उत्तरसभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवादाचे आरोप लावले. यावेळी जेम्स लेननं वादग्रस्त पुस्तक लिहिलं त्यावरून राज्यात शरद पवारांनी(Sharad Pawar) जातीयवाद पेरला असा आरोप मनसेने केला. संभाजी ब्रिगेडसारखी संघटना १९९९ नंतरच उदयास आली असंही राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरेंच्या विधानावर संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादीनं आक्षेप घेत बाबासाहेब पुरंदरे यांनी जेम्स लेनच्या पुस्तकाचं कौतुक केल्याचं म्हटलं होते.
मात्र त्यानंतर मनसेने बाबासाहेब पुरंदरे(Babasaheb Purandare) यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाला पाठवलेल्या पत्र समोर आणलं. आता या प्रकरणात आणखी एक वळण लागलं आहे. ज्या छत्रपती शिवरायांबाबत जेम्स लेननं वादग्रस्त पुस्तक(James Laine Controversial Book) लिहिलं होते त्याने बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. इंडिया टुडेने घेतलेल्या मुलाखतीत जेम्स लेननं हे भाष्य केले आहे. त्या पुस्तकात आपण कुठलाही ऐतिहासिक दावा केला नाही. तसेच पुस्तकासाठी कुणीही माहिती पुरवली नाही असंही जेम्स लेननं म्हटलं आहे.
अलीकडेच शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरे यांनी जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिल्याचा आरोप केला होता. त्यावर राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना सॉफ्ट टार्गेट बनवलं आणि जातीयवाद महाराष्ट्र आणला असं सांगितले. त्याचसोबत चुकीचा इतिहास कोणत्या पानावर सांगितला ते सांगा असं आव्हानही राज ठाकरेंनी केले होते. यावर आता जेम्स लेनचं स्पष्टीकरण पुढे आले आहे. जेम्स लेन म्हणतो की, माझं Shivaji Hindu King In Islamic India पुस्तक त्यात कुठलाही ऐतिहासिक दावा केला नाही. मी फक्त कथा सांगितली त्याला ऐतिहासिक तथ्य नाही. त्याचसोबत बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी एका शब्दानेही चर्चा झाली नाही असं स्पष्टीकरण त्याने दिले आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे बाबासाहेब पुरंदरे समर्थक होते. छत्रपती शिवाजी महाराज महान वीर होते. मात्र त्यांचे साहित्य विद्वत्तेचा विषय नसून समकालीन राजकीय विवादाचं साधन झालं त्याची खंत वाटते. मी जे पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये असा कुठलाही उल्लेख नाही. ज्यांनी टीका केली आहे त्यांना या पुस्तकातील कथानक समजलेले नाही असंही लेखक जेम्स लेननं म्हटलं आहे.