ना इंजिनीअर, ना एस्टिमेट, आदिवासींनीच बांधला ६० मीटर लांबीचा नाल्यावर पूल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 07:10 AM2021-10-06T07:10:33+5:302021-10-06T07:11:12+5:30

भामरागडच्या दुर्गम भागात लोक रस्ते, पुलांअभावी विविध समस्यांना तोंड देत असतात. आदिवासीबहूल दुर्गम क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरात घनदाट जंगल आहे.

No engineer, no estimate, 60 meter long nala bridge built by tribals gadchiroli | ना इंजिनीअर, ना एस्टिमेट, आदिवासींनीच बांधला ६० मीटर लांबीचा नाल्यावर पूल 

ना इंजिनीअर, ना एस्टिमेट, आदिवासींनीच बांधला ६० मीटर लांबीचा नाल्यावर पूल 

Next

श्यामराव येरकलवार

लाहेरी (जि. गडचिरोली) : पावसाळ्यात उर्वरित जगाशी संपर्क बंद पाडणाऱ्या नाल्यावर पूल बांधून द्यावा, यासाठी सरकारदरबारी अर्ज-विनंत्या केल्या. सरकार पूल बांधून देत नाही म्हणून किती दिवस अडचणी झेलत राहायचे? अखेर आपली समस्या आपणच सोडवायची, असा निर्धार करत त्यांनी त्या खळखळ वाहणाऱ्या नाल्यावर लाकडी पाट्यांचा मजबूत पूल तयार करून घेतला. ना कुणी अभियंता, ना एस्टिमेट. आदिवासीच अभियंता झाले आणि आपल्या कल्पकतेतून त्यांनी पूल साकारला.

भामरागडच्या दुर्गम भागात लोक रस्ते, पुलांअभावी विविध समस्यांना तोंड देत असतात. आदिवासीबहूल दुर्गम क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरात घनदाट जंगल आहे. या भागात पाऊसही जास्त पडतो. त्यामुळे पावसाळ्यात डोंगरदऱ्यातून ओसंडून वाहणाऱ्या नदी, नाल्यांमुळे पैलतीरावरील गावांचा संपर्क तुटतो. गुंडेनूर नाल्यावर पूल नसल्यामुळे या गावातील नागरिक मागील ६ वर्षांपासून पावसाळ्यात बांबूपासून ताटवे बनवून पूल तयार करायचे. पाण्याचा प्रवाह चांगला असेपर्यंत ते टिकून राहात. त्यामुळे यावर्षी नवीन प्रयोग करत बांबूऐवजी लाकडी पाट्यांचा पूल गावकऱ्यांनी बनविला. जवळपास ६० मीटर लांबीचा हा पूल बांबूच्या पुलापेक्षा मजबूत आहे.

दरवर्षीची कसरत, पक्का पूल हवा
गुंडेनूर नाल्यावर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात नदी पार करणे अशक्य होऊन एका गर्भवतीला प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे शासनाने पूल बनवून द्यावा म्हणून रडगाणे गात बसण्याऐवजी श्रमदान करून स्वत:च आपली समस्या दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, नागरिकांनी शोधलेला हा उपाय कायमस्वरुपी नाही. दरवर्षी त्यांना ही कसरत करावी लागते. नाल्यावर पक्का पूल तयार करून दिल्यास बिनागुंडा परिसरातील अनेक गावांचा भामरागडशी बारमाही संपर्क राहील.

Web Title: No engineer, no estimate, 60 meter long nala bridge built by tribals gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.