कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राशिवाय कर्नाटकात प्रवेश नाही; कोगनोळी येथील आंतरराज्य सीमेवर तपासणी पथकाची उभारणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 08:13 PM2021-02-20T20:13:43+5:302021-02-20T20:14:21+5:30
महाराष्ट्रातील कोविड रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या लक्षात घेता कर्नाटक सरकारने खबरदारीचे उपाय अवलंबण्यास सुरुवात केली आहे.
बाबासो हळिज्वाळे
महाराष्ट्रातील कोविड रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या लक्षात घेता कर्नाटक सरकारने खबरदारीचे उपाय अवलंबण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी कोगनोळी येथील महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या टोलनाका या ठिकाणी तपासणी पथकाची उभारणी करण्यात आली आहे. कर्नाटकात प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे अत्यावश्यक करण्यात आले आहे.
बेळगाव जिल्हा प्रशासन व निपाणी तालुका प्रशासन यांच्या वतीने कोगनोळी टोल नाका या ठिकाणी कोविड तपासणी पथकाची उभारणी करण्यात आली असून महसूल विभाग, आरोग्य विभाग व पोलिस प्रशासन यांच्याकडून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्कॅनिंग करून व कोविड प्रमाणपत्र पाहूनच कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे.
पोलीस प्रशासन महसूल विभागातील कर्मचारी आरोग्य विभागातील कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्या यांच्यावतीने थर्मल स्कॅनिंग करून संसर्गजन्य आजाराची लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींनाच कर्नाटकात प्रवेश दिला जाईल. येत्या 48 ते 72 तासांमध्ये कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीने काढून घेणे बंधनकारक आहे, असे प्रमाणपत्र नसणाऱ्या व्यक्तींना कर्नाटकातील प्रवेशास मज्जाव करण्यात येणार असल्याचे निपाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.
सोमवारपासून प्रमाणपत्र नाहीतर प्रवेश नाही
सध्या कोविड प्रमाणपत्राची सक्ती केली नसली तरी येत्या 48 ते 72 तासांमध्ये प्रमाणपत्र काढून घेऊनच कर्नाटकात प्रवेश करावा. त्या संदर्भातील जागृती डिजिटल फलकाद्वारे याठिकाणी करण्यात आली आहे. मोटरसायकल पासून बस पर्यंत सर्वच वाहनांचे थर्मल स्कॅनिंग करूनच कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे. जर काही कोविड सदृश्य लक्षणे आढळली तर त्यांना परत पाठविण्यात येईल.