Vidhan Sabha 2019: 'या' गावात पुढाऱ्यांना 'नो एंट्री'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 05:00 PM2019-09-19T17:00:51+5:302019-09-19T18:01:01+5:30
विधानसभा निवडणुकीला मतदान न करण्याचा निर्णय सुद्धा या गावकऱ्यांनी घेतला आहे.
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिक आपल्या प्रश्नांवर आक्रमक होताना दिसत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर ते रघुनाथपूरवाडी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, ग्रामस्थांनी रस्त्याचे काम करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडे सातत्याने करून देखील केवळ मतांचा जोगवा मागणाऱ्या लोकप्रतिनिधीनी या मागणीकडे कायम दुर्लक्ष केले. त्यामुळे येथील गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयएसओ मानांकित ग्रामपंचायत असलेल्या रघुनाथपूरवाडीला शिऊर गावाने जोडणारा सहा किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाला आहे. प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही या रस्त्याचे भाग्य काही उजळले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जो पर्यंत गावाला जोडणारा रस्ता बनत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना गावात येण्यास बंदी घालण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. त्याच बरोबर विधानसभा निवडणुकीला मतदान न करण्याचा निर्णय सुद्धा या गावकऱ्यांनी घेतला आहे.
विशेष म्हणजे याच गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत सुद्धा मतदानावर बहिष्कार टाकला होता. प्रशासकीय अधिकरी व राजकीय नेत्यांच्या विनंतीनंतर सुद्धा गावकऱ्यांनी आधी रस्ता त्यांनतरचं मतदान करण्याची भूमिका घेतली होती. मात्र अजूनही हा रस्ता बनला नसल्याने आता पुन्हा गावकऱ्यांनी आगामी निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाला किंवा लोकप्रतिनिधीना आता तर जाग येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.