नाशकात वाहनांना २८, २९ आॅगस्टला नो एण्ट्री
By admin | Published: August 27, 2015 04:35 AM2015-08-27T04:35:48+5:302015-08-27T04:35:48+5:30
सिंहस्थाची पहिली आणि सगळ््यात मोठी पर्वणी २९ आॅगस्ट रोजी असल्याने सुरक्षा व बंदोबस्ताचा भाग म्हणून २८ आणि २९ आॅगस्ट रोजी नाशिक शहरात कोणत्याही वाहनाला
ठाणे : सिंहस्थाची पहिली आणि सगळ््यात मोठी पर्वणी २९ आॅगस्ट रोजी असल्याने सुरक्षा व बंदोबस्ताचा भाग म्हणून २८ आणि २९ आॅगस्ट रोजी नाशिक शहरात कोणत्याही वाहनाला प्रवेशबंद करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये अथवा नाशिकमार्गे जाणाऱ्या अथवा येणाऱ्या कोणत्याही वाहनाला नाशिकला जाणे टाळणे अथवा भला मोठा वळसा घालून जाणे, हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत.
२८ तारखेच्या मध्यरात्रीपासून ते २९ तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्बंध जारी असणार आहेत. त्यामुळे मुंबई, बृहन्मुंबई, कोकण येथून नाशकात जाणाऱ्या सर्व एसटी, टॅक्सी, खासगी बसेस नाशिकपासून १० किमी अंतरावर असलेल्या राजूरबहुला येथे उभारण्यात आलेल्या वाहनतळावरच थांबविल्या जातील. ज्यांना नाशिक शहरात जायचे असेल, त्यांनी तेथून सुटणाऱ्या शहर बससेवेच्या बसने नाशिकपर्यंतचा प्रवास करावा, तोदेखील नाशिक महामार्ग स्थानकापर्यंतच असेल. त्यापुढचा शहरातील सर्व प्रवास त्यांनी पायी करावा, असे नियोजन करण्यात आले आहे. या काळात शहरातील रिक्षा आणि अन्य खासगी वाहने यांनाही बंदी करण्यात आली आहे. जी वाहने नाशिक ओलांडून पुढे जाऊ इच्छित असतील, त्यांच्यासाठी घोटीवरून सिन्नर, निफाडमार्गे पिंपळगाव - बसवंत अथवा चांदवडमार्गे जाण्याची अनुमती आहे. परंतु, या मार्गाने ४० ते ५० किमीचा अतिरिक्त वळसा पडणार आहे. तसेच हा रस्ताही अरुंद असल्याने अपघात अथवा ट्रॅफिक जॅमची दाट शक्यता असणार आहे.
एसटी, खासगी बसेस, टॅक्सी आदी वाहनांवर बंदी घालण्यात आल्याने या दोन ते तीन दिवसांत नाशिकच्या दिशेने जाणारा अथवा येणारा प्रवाशांचा सर्व ओघ रेल्वेच्या दिशेने धाव घेईल. सिंहस्थासाठी खास गाड्या सोडलेल्या असल्या तरी दीड ते दोन कोटी भाविक या दोन दिवसांत नाशिकमध्ये येणार असल्याने त्यांच्यासाठी रेल्वे हाच पर्याय आहे. परिणामी, रेल्वेत जागा मिळणार नाही.