निधीचे मानापमान नको

By admin | Published: November 5, 2016 03:34 AM2016-11-05T03:34:18+5:302016-11-05T03:34:18+5:30

डोंबिवलीत होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ५० लाखांच्या निधीला २७ गावांच्या राजकारणाचा फटका

No fund manipulation | निधीचे मानापमान नको

निधीचे मानापमान नको

Next

मुरलीधर भवार,

डोंबिवली- डोंबिवलीत होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ५० लाखांच्या निधीला २७ गावांच्या राजकारणाचा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागल्याने हा निधी मानापमानात अडकवू नका, अशी भूमिका विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घेतली आहे.
आयोजक आगरी युथ फोरमला हा निधी लवकरात लवकर मिळावा यासाठी लवकरच पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही हे संमेलन शहराचे असावे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच त्यात सर्वांचा यथोचित सन्मान व्हावा, असे मत मांडत संमेलनाला सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली. विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी तर दोन पावले पुढे जात या संमेलनाला पालिकेने दोन कोटी रूपये द्यावेत, अशी भूमिका घेतली.
या विषयावर प्रतिक्रियेसाठी स्वागताध्यक्ष आणि आयोजक आगरी युथ फोरमच्या प्रतिनिधींशी संपर्काचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. २७ गावांतील संघर्ष समितीच्या नेत्यांनीही गावांचे राजकारण आणि संमेलनाच्या निधीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
>अद्याप ठरावच नाही!
संमेलनासाठी महापालिकेने ५० लाखांची तरतूद केल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात या तरतुदीचा ठराव अद्याप महासभेत मंजूर झालेला नाही. येत्या महासभेत हा ठराव मंजूर करु, असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. सांस्कृतिक कार्यासाठी महापालिकेने २०१२-१३ या वर्षी १० लाख ४२ हजार, २०१३-१४ मध्ये सात लाख ६२ हजार, २०१५-१६ ला १२ लाख १५ हजारांची तरतूद केली होती, तर २०१४-१५ साली अर्थसंकल्पात सांस्कृतिक कार्यासाठी एका रूपयाचीही तरतूद नव्हती.
यावरुन पालिकेची सांस्कृतिक कार्याविषयीची अनास्था दिसून येते. यंदाच्या वर्षी ५० लाखांची तरतूद करण्यात आली. त्या व्यक्तिरिक्त कल्याण व डोंबिवलीतील सांगीतिक कार्यक्रमासाठी प्रत्येकी १० लाखांची तरतूद आहे. त्यापैकी ५०लाख संमेलनासाठी आहेत.
२०१२ सालापासून करण्यात आलेली तरतूद प्रत्यक्षात ठराव रुपाने मंजूर होऊन संस्थांना वितरित झाली की नाही. प्रत्यक्षात त्याच कामावर खर्च झाली का, याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडे नाही.
>निधीवरून मानापमान नकोच : हळबे
संमेलन डोंबिवलीला होत आहे. ही बाबच मूळात गौरवास्पद आहे. महापालिकेने ठाण्याच्या साहित्य संमेलनाला २५ लाखाचा निधी दिला होता. त्यावेळी मानापमानाचा मुद्दा आला नाही. तर मग तो आताही येता कामा नये. पक्षाला व नेत्यांना विचारात घेतले नाही, या कारणावरुन निधी अडवून ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. तरतूद करण्यात आलेला निधी संमेलनाला दिला गेला पाहिजे. संंमेलनासाठी राजकारण बाजू ठेवले गेले पाहिजे, असे स्पष्ट मत मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी मांडले.
>यथोचित सन्मान
व्हावा : महापौर
साहित्य संमेलन ही शहरासाठी गौरवास्पद बाब असली तरी साहित्य संमेलनात सर्वांचा यथोचित सन्मान व्हावा. हे संमेलन शहराचे वाटावे; तर निधी काय सर्वोतोपरी सहकार्य करण्याची आमची भूमिका आाहे, असे महापौरांनी स्पष्ट केले. संंमेलनासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात ५० लाखांची तरतूद केली आहे.
संमेलन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. अध्यक्षपदाच्या घडामोडी सुरु आहेत, तर काही बाकी आहेत. त्यामुळे हा निधी देण्याचा ठराव अद्याप केलेला नसला, तरी तो केला जाईल. आगरी यूथ फोरमने संमेलनात सगळ््यांचा यथोचित सन्मान करावा. संमेलन हे शहराचे वाटले पाहिजे, तरच त्याला सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
दोन कोटी द्या : भोईर
विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर यांनी सांगितले की, डोंबिवलीत संंमेलन होत आहे ही मानाची बाब आहे. महापालिकेने ५० लाख रुपयांचा निधी ठेवला. ठाण्यातील संमेलनासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने २५ लाख रुपयांचा निधी दिला होता. कल्याण डोंबिवली महापालिके इतर महापालिकेस २५ लाख रुपये देते.
आपल्या शहरात होत असताना केवळ ५० लाख रुपयांची तरतूद करते. महापालिकेचा वार्षिक अर्थ संकल्प २ हजार कोटी रुपयांचा आहे. केलेली तरतूद पाहता एकूण अर्थ संकल्पाच्या केवळ अर्धा टक्केच तरतूद केली आहे. वास्तविक पाहता संमेलनासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
>सरमिसळ नको : दामले
२७ गावांचा मुद्दा वेगळा आहे. आगरी यूथ फोरमने त्याची सरमिसळ संमेलनाशी करु नये, गावांसाठी पालिकेचा निधी आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचा निषेध करणे कितपत योग्य आहे. शहरात संमेलन आहे. त्याला ५० लाखांचा निधी दिला जाईल. त्याला भाजपचा विरोध असण्याचे कारण नाही. निधीचा ठराव लवकर मंजूर व्हावा, यासाठी येत्या महासभेत घेतला जाईल, असे भाजपा नेते राहूल दामले म्हणाले.

Web Title: No fund manipulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.