भाजपला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही
By appasaheb.patil | Published: November 20, 2019 02:46 PM2019-11-20T14:46:37+5:302019-11-20T14:49:41+5:30
सुभाष देशमुख; राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं
सोलापूर : भाजप आणि शिवसेना हे दोनही पक्ष हिंदुत्ववादी आहेत आणि हिदुत्वाच्या आधारावरच या दोन्ही पक्षांना महाराष्ट्रातील जनतेने स्पष्ट कौल दिला आहे. आता शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तिन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र येत राज्यात सरकार स्थापन करण्याचा डाव आखत आहेत़ मात्र राज्यात सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या भाजपला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही असा विश्वास माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते़ पुढे बोलताना सुभाष देशमुख म्हणाले की, राज्यात भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी युती करून विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत़ यात भाजपाचे १०५ तर शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले आहेत़ ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री असावा हा अलिखित नियम आहे. त्यामुळे भाजपने सत्ता स्थापन करताना भाजपचा मुख्यमंत्री व्हावा असा आग्रह धरला आहे. मात्र शिवसेनेने अवाढव्य मागण्या केल्यामुळे राज्यात सरकार स्थापन करण्यास विलंब झाला.
महायुतीने सत्तास्थापन न करून राज्यातील जनतेची घोर निराशा केली आहे़ आता शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न करीत आहे़ मात्र भाजपला सोडून कोणतेही सरकार राज्यात सर्वाधिक काळ टिकणार नाही़ एवढेच नव्हे तर ते सरकार सुरक्षित राहील की नाही हेही सांगणे अवघड असल्याचं मत माजी सहकारमंत्री आ़ सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
दरम्यान, भाजप - शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी सर्व दरवाजे खुले आहेत़ एकत्र येऊन बसल्याशिवाय युतीचं सत्तास्थापन अशक्य आहे़ राजकारणात कधीही काहीही होवू शकतं असंही देशमुख यांनी सांगितले.