'नो हेल्मेट, नो पेट्रोल'चा निर्णय सरकारच्या अंगलट
By admin | Published: July 28, 2016 05:47 PM2016-07-28T17:47:19+5:302016-07-28T17:47:19+5:30
परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या हेल्मेट न घालणा-या दुचाकीस्वारांना पेट्रोल पंपावर इंधन न देण्याच्या आदेशावर विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या हेल्मेट न घालणा-या दुचाकीस्वारांना पेट्रोल पंपावर इंधन न देण्याच्या आदेशावर विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. या आदेशाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार विरोध करून हा निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. त्याच्या उत्तरदाखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
फक्त कायद्याच्या सक्तीमुळे लोक हेल्मेट वापरतील, अशी आशा करणं योग्य नाही. त्यासाठी दुचाकीस्वारांना कोणत्या तरी वेगळ्या मार्गानं हेल्मेटचं महत्त्व कसं पटवून देता येईल याचा विचार करायला हवा. मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे शिवसेना बॅकफूटवर गेली असून, भाजप आणि शिवसेनेतील मतभेद पुन्हा एकदा दिसून आले आहेत.
यावेळी अजित पवार यांनी याच मुद्द्यावर सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री स्वत:देखील या निर्णयासाठी अनुकूल नसून रावतेंच्या आग्रहाखातरच हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे, असे सांगत अजित पवारांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.