नो हॉर्न प्लीज!
By Admin | Published: January 18, 2015 02:17 AM2015-01-18T02:17:05+5:302015-01-18T02:17:05+5:30
दोन वर्षांपूर्वी ‘लोकमत वृत्तपत्र समूह’ने ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात ‘एचबीकेबी’ नावाने राबविलेल्या एका मोहिमेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले
‘लोकमत’च्या मोहिमेला यश : वाहनांच्या हॉर्नबाबत मानके निश्चित
विहंग सालगट/ मुस्तफा मुनीर ल्ल नागपूर
दोन वर्षांपूर्वी ‘लोकमत वृत्तपत्र समूह’ने ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात ‘एचबीकेबी’ नावाने राबविलेल्या एका मोहिमेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले असून, वाहनांच्या हॉर्नबाबत सुधारणा करण्यासंदर्भात शासनाला आदेश दिला आहे. न्यायालयाच्या आदेशावर अंमल करीत शासनाने कर्कश हार्नच्या संदर्भात नवीन आदेश काढला असून, हॉर्नबाबत काही प्रमाणके (मानके) निश्चित केली आहेत.
वाहनांची वाढती गर्दी आणि कर्कश आवाजातील हॉर्नमुळे मोठ्या शहरांमधील नागरिकांचा जीव गुदमरून गेला आहे. गरज नसतानाही मोठ्या आवाजात हॉर्न वाजवत भरधाव धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले. ध्वनिप्रदूषण वाढले, शिवाय शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, रुग्णालयांतील रुग्ण, प्रार्थनास्थळे आणि नागरी वस्त्यांमधील रहिवाशांना कर्कश हॉर्नचा नाहक त्रास होतो आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी ‘लोकमत वृत्तपत्र समूह’ने कर्कश हॉर्नच्या विरोधात ‘एचबीकेबी’ नावाने राज्यव्यापी मोहीम हाती घेतली होती. वृत्तपत्र, होर्डिंग्ज, मानवी साखळी, विद्यार्थी रॅली आणि विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात आली. ‘लोकमत’च्या या जनजागृती मोहिमेची दखल घेत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कर्कश हॉर्नबाबत ठोस उपाययोजना करण्याचा आदेश शासनाला दिला होता. त्यानुसार राज्य शासनाने ठोस पावले उचलली आहेत. शासनाने एका अधिसूचनेद्वारे कुठल्याही वाहनाच्या इंजिनाच्या तुलनेत हॉर्नचा आवाज १० डीबी (ए) पेक्षा अधिक नसावा, असा निर्णय घेतला आहे.
पोलीस व्हॅन, रुग्ण वाहिकाही नियमातच
रुग्णवाहिका, पोलीस व्हॅन आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांसाठीही सायरन आणि हॉर्नची नियमावली तयार केली आहे. आवश्यक असेल तरच संरक्षित क्षेत्रात हॉर्नचा उपयोग करता येईल. निवासी क्षेत्रातही रात्रीच्या वेळी आवश्यकते प्रमाणेच सायरन वाजविता येणार आहे.
अधिसूचनेप्रमाणे पर्यावरण संरक्षण नियम १९८६ नुसार वाहनाच्या इंजिनाच्या ध्वनीच्या तुलनेत हॉर्नचा आवाज १० डीबी (ए) पेक्षा अधिक नसावा. हार्न बोनेटच्या खालील भागात असावा. मल्टिटोन हार्नवर पूर्णपणे प्रतिबंध लावला आहे. ‘नो हॉकिंग’ क्षेत्रात हॉर्न वाजविण्यावर प्रतिबंध लावला आहे. ‘नो हॉकिंग झोन’मध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी, डहाणू आदी वनसंरक्षण क्षेत्र, राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य आणि युनेस्कोद्वारा घोषित वर्ल्ड हेरिटेज स्थळांचाही सहभाग करण्यात आला आहे.
काय आहेत मानके...
इंजिनाच्या आवाजाच्या
तुलनेत १० डीबी
(ए) पेक्षा हॉर्नचा आवाज कमी असावा़
हॉर्न बोनेटच्या खाली असावा. ‘नो हॉकिंग झोन’ अनावश्यक हॉर्न वाजवू नये़
पोलीस व्हॅन, रुग्णवाहिका आणि अग्निशमन गाड्यांना संरक्षित क्षेत्रात हॉर्न वाजविण्यास प्रतिबंध
रात्री पोलीस व्हॅन, रुग्णवाहिका आणि अग्निशमन गाड्यांना आवश्यक असल्यासच सायरनची परवानगी