शरद पवार यांना नोटीस देण्याचे निर्देश नाहीत; निवडणूक आयोगाने केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 06:35 AM2020-09-24T06:35:22+5:302020-09-24T06:40:02+5:30
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रासंदर्भात प्राप्तिकर विभागाने नोटीस दिली आहे, असे पवार यांनी मंगळवारी म्हटले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांबाबत नोटीस जारी करण्यासंदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (सीबीडीटी) कोणतेही निर्देश दिले नाहीत, असे निवडणूक आयोगाने बुधवारी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रासंदर्भात प्राप्तिकर विभागाने नोटीस दिली आहे, असे पवार यांनी मंगळवारी म्हटले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवेदन जारी करीत उपरोक्तपणे स्पष्टीकरण दिले आहे. निवडणुकीत दाखल केलेल्या काही निवडणूक प्रतिज्ञापत्रांबाबत प्राप्तिकर विभागाने स्पष्टीकरण आणि उत्तर मागावले आहे, असे पवार यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. मला काल नोटीस आली. सर्व सदस्यांपैकी आमच्याबद्दलच केंद्राची ‘प्रेमाची भावना’ यातून दिसते. त्याबद्दल आनंद आहे, असा टोला शरद पवार यांनी यावेळी लगावला होता. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून प्राप्तिकर विभागाने दिलेल्या नोटीसला लवकरच उत्तर देणार आहे, असेही पवार यांनी म्हटले होते. निवडणूक आयोगाने निवेदन जारी केले आहे. निवडणूक आयोगाने पवार यांना नोटीस देण्यासाठी सीबीडीटीला निर्देश दिले नाहीत, असे आयोगाने यात नमूद केले आहे.