मध्यावधी नाहीच; सेनेची चिंता सोडा
By admin | Published: June 17, 2017 03:22 AM2017-06-17T03:22:55+5:302017-06-17T03:22:55+5:30
शिवसेनेचे नेते करीत असलेल्या टीकेची चिंता करू नका. स्वत:ची ताकद वाढवा, भाजपाची शक्ती वाढवा, मग विरोधातील तोंडे आपोआपच बंद होतील, असा आदेशवजा
यदु जोशी। लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेचे नेते करीत असलेल्या टीकेची चिंता करू नका. स्वत:ची ताकद वाढवा, भाजपाची शक्ती वाढवा, मग विरोधातील तोंडे आपोआपच बंद होतील, असा आदेशवजा सल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज महाराष्ट्रातील पक्षजनांना दिला. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली. पाच वर्षे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील, असा निर्वाळाही त्यांनी दिला.
भाजपाचे प्रदेश पदाधिकारी सर्व जिल्हाध्यक्ष आणि अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शहा यांनी शुक्रवारी दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे आदी यावेळी उपस्थित होते. पक्षाचे मंत्री आणि आमदारांची स्वतंत्र बैठकही त्यांनी घेतली. ‘शिवसेना आपल्यावर टीका- आरोप करण्याची हिंमत का करते, कारण आपली ताकद कमी आहे म्हणून. उद्या आपण ही ताकद वाढविली, तर कुणी आपल्याला अशा पद्धतीने लक्ष्य करूच शकणार नाही,’ असे अमित शहा म्हणाले. या बैठकीत पूर्णत: संघटनात्मक चर्चा झाली. तथापि, एका पदाधिकाऱ्याने, ‘शिवसेना आमच्यासोबत सत्तेत असूनही आमच्यावरच सतत टीका करते, अशावेळी काय करायचे, अशी विचारणा त्यांच्याकडे केली. त्यावर शहा यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
घरात केबिनमध्ये बसून पक्ष चालवू नका. जनतेत जा, त्यांचे दु:ख जाणून घ्या. पक्ष आणि सरकारमधील दुवा बनण्याचे काम करा. गावागावांमध्ये रात्रीच्या मुक्कामी जा, असा आदेशही शहा यांनी दिला. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भाजपातर्फे विस्तारक योजना राबविली जात आहे. शहा यांनी या योजनेचा पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. मध्यंतरी राबविलेल्या शिवार संवाद यात्रेची माहितीही घेतली.
शहा यांचा कानमंत्र
प्रत्येक तालुक्याने आपल्या भागात होत असलेल्या पक्षकार्याची माहिती रोजच्या रोज रजिस्टरमध्ये लिहिली पाहिजे.
बुथचे ए,बी, सी असे वर्गीकरण करा. पक्षाचे काम अजिबात चांगले नाही, अशा सी वर्गातील बुथमध्ये पक्षवाढीसाठी प्रत्येक तालुक्यात १५ जणांची टीम करा.
प्रदेश व जिल्हा भाजपाने काढलेले प्रत्येक पत्रक प्रत्येक बुथपर्यंत पोहोचलेच पाहिजे.
स्वत:चे बळ वाढवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा यावर निवडणुका जिंकू, या भरवशावर न राहाता प्रत्येकांनी निवडून येण्याची क्षमता वाढवली पाहिजे. शतप्रतिशत भाजपासाठी प्रयत्न करा, असा कानमंत्रही त्यांनी राज्यातील भाजपाच्या मंत्र्यांना दिला.
मित्रांशी चर्चा, शेट्टी दूरच
शहा यांनी आज राज्यातील भाजपाचे मित्र पक्षांच्या नेत्यांशीही चर्चा केली. त्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रासपचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, जनसुराज्यचे विनय कोरे यांचा समावेश होता. सध्या राज्य व केंद्र सरकारविरोधात भूमिका घेतलेले खा.राजू शेट्टी यांनी मात्र दूर दिल्लीत राहणेच पसंत केले.
नवी दिल्लीत शेतकरी नेत्यांसमवेत मी बैठकीत व्यस्त असल्यामुळे मुंबईतील चर्चेला उपस्थित राहता येणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना कळविले आहे. या बैठकीसाठी मी संघटनेचा प्रतिनिधी म्हणून कुणालाही नियुक्त केलेले नाही आणि करायचेच असेल तर प्रदेशाध्यक्षांना तशा सूचना दिल्या जातील, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
पाच वर्षे फडणवीसच
महाराष्ट्रातील भाजपा सरकारला कसलाही धोका नाही. देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी असतील, असे सांगत पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मध्यावधीची शक्यता साफ फेटाळली. ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी पुढच्या निवडणुकीत २०० जागा निवडून आणून स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा मनोदय व्यक्त केला.
त्यांना पक्षात आणा
महिला, दलित, आदिवासी, धार्मिक-शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, बुद्धीजीवी अशांशी संपर्क ठेवा. त्यातील जे भाजपात नाहीत, त्यांना जोडण्याचा प्रयत्न करा. पदाच्या अपेक्षेने कुणी पक्षात आला असेल, तर त्याला आधी पक्षाचे काम द्या. तो त्यात यशस्वी झाला, तर टिकेल, नाही झाला तर तोच आपोआप बाहेर पडेल, असेही शहा म्हणाले.
अंधारात जा; डोळे मिटा अन्
पक्षाने आपल्याला काय दिले, यापेक्षा पक्षाला आपण काय देतोय याचा विचार करा. पक्ष आहे म्हणून तुम्ही आहात हे लक्षात ठेवा.
पक्ष नसेल, तर तुमची गत काय असेल, हे बघायचेच असेल, तर एकदा अंधाऱ्या खोलीत जा, डोळे मिटा आणि स्वत:तून भाजपाला वजा करा, म्हणजे आपण काय आहोत, ते कळेल, असे खडेबोल अमित शहा यांनी सुनावले.
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी आदरांजली वाहिली
शुक्रवारी सकाळी शहा यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपा नेत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
शहा विमानतळावरून थेट दादर येथील चैत्यभूमीवर गेले. तेथे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर सावरकर स्मारकाच्या प्रांगणातील वीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
त्यानंतर शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली.