कुठल्याही प्रकारची नाराजी नाही -मुरली मनोहर जोशी
By admin | Published: May 13, 2014 04:27 AM2014-05-13T04:27:06+5:302014-05-13T04:27:06+5:30
भाजपाचे जेष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी मनात कुठल्याही पद्धतीचा असंतोष नसल्याचे मत व्यक्त केले आहे. वाराणशीची जागा सोडावी लागल्यामुळे जोशी असंतुष्ट असल्याची जोरदार चर्चा होती.
वाराणशी : भाजपाचे जेष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी मनात कुठल्याही पद्धतीचा असंतोष नसल्याचे मत व्यक्त केले आहे. वाराणशीची जागा सोडावी लागल्यामुळे जोशी असंतुष्ट असल्याची जोरदार चर्चा होती. परंतु अखेर त्यांनी या चर्चांना अखेरच्या टप्पातील मतदानाच्या दिवशी पूर्णविराम दिला आहे. देशात मोदी व भाजपाचीच लाट असल्याचा दावादेखील त्यांनी केला आहे. मुरली मनोहर यांचा असंतोष यंदाच्या निवडणूकांदरम्यान चांगलाच गाजला. जोशी यांना भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासाठी वाराणशीची जागा सोडावी लागली होती व त्यांनी कानपूर येथून निवडणूक लढवावी लागली. भाजपाने घेतलेल्या या निर्णयामुळे जोशी यांनी नाराजीदेखील व्यक्त केली होती. शिवाय देशात मोदी यांची लाट नसल्याचेदेखील ते म्हणाले होते. परंतु या सर्वांचे आता जोशी यांनी खंडन केले आहे. वाराणशी येथील अरदली बाजार क्षेत्रात मतदान केल्यानंतर ते बोलत होते. गंभीरतेने विचार करुन पक्षाने जागेसंदर्भात निर्णय केला होता. मोदी यांना उत्तरप्रदेशातून तिकीट देणे लाभदायक ठरेल. पूर्ण बहुमत मिळविण्यासाठी आम्ही अनेक बदल केले व वाराणशीतून मोदी यांनी निवडणूक लढविणे हादेखील त्यातीलच एक बदल होता असे जोशी यांनी स्पष्ट केले. देशात बदलाची हवा वाहत असून भाजपाची लाट सगळीकडे दिसून येत आहे. मोदी या लाटेचे नेतृत्व करत आहेत. भाजपाशिवाय मोदी नाहीत. भाजपा व मोदी यांचे एकत्रित स्वरुप या लाटेत दिसून येत आहे असे जोशी म्हणाले.