खारघरनंतर वहाळमध्येही नो लिकर झोन
By Admin | Published: April 26, 2016 02:36 AM2016-04-26T02:36:28+5:302016-04-26T02:36:28+5:30
नो लिकर झोन करण्यासाठी आठ महिन्यांपासून महिलांनी सुरू केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन सोमवारी मतदान घेण्यात आले.
नवी मुंबई : खारघरनंतर वहाळ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामधील चार गावे व उलवे नोड नो लिकर झोन करण्यासाठी आठ महिन्यांपासून महिलांनी सुरू केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन सोमवारी मतदान घेण्यात आले. महिलांनी बहुमताने दारूबंदीच्या बाजूने कौल दिल्याने सुरू झालेला एक बार बंद होणार आहे तर प्रस्तावित १९ बारना गाशा गुंडाळावा लागणार आहे. महिलांच्या या एकजुटीचे पनवेल व उरण तालुक्यामधील सर्वांनीच अभिनंदन केले आहे.
वहाळ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जावळे, बामणडोंगरी, मोरावे येथील ग्रामस्थांनी २६ जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या ग्रामसभेमध्ये हा परिसर नो लिकर झोन म्हणून घोषित करण्याचा ठराव मंजूर केला होता. परिश्रम करून ग्रामस्थांनी लग्नातील अवाढव्य खर्च, हळदी समारंभात होणारे मद्यपान व इतर अनेक चुकीच्या प्रथा बंद केल्या होत्या. आदर्श ग्रामपंचायत म्हणून रायगड जिल्ह्यात या परिसराची ओळख निर्माण होत असताना आठ महिन्यांपूर्वी सरकारने वहाळ गावच्या शाळेजवळच रजत बारला परवानगी दिली. हा बार सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. महिलांनी या बारला विरोध करून तो बंद करण्यासाठी भव्य मोर्चा काढला होता. नो लिकर झोन करण्यासाठी चारही गावामधील महिलांनी सह्यांचे निवेदन रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीसाठी महिलांचे मतदान घेण्याचे निश्चित केले. मतदानासाठी किमान गावातील २५ टक्के महिलांनी मागणी करणे आवश्यक असते. यामुळे प्रशासनाने सह्यांचे निवेदन दिलेल्या महिलांच्या सह्यांची छाननी करण्यास सुरुवात केली. एक दिवस सकाळी १० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवेदनावरील सह्या व प्रत्यक्षात त्या महिलांना अधिकाऱ्यांसमोर सह्या करण्यास लावून त्याची सत्यता पडताळण्यात आली व अखेर २५ एप्रिलला मतदान घेण्याची घोषणा करण्यात आली.
वहाळ ग्रामपंचायत परिसरामध्ये दारूबंदीसाठी सुरू असलेल्या मतदानाकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. दारूबंदीच्या बाजूने किती महिला मत देतात याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. परिसरातील महिला मंडळाने चार गावे व उलवे नोडमध्ये जनजागृती करून दारूची दुकाने आपल्या विभागात का नकोत, ही भूमिका समजावून सांगितली. सकाळी वहाळ, बामणडोंगरी, मोरावे, जावळेच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदान घेण्यात आले. महिलांनी सकाळपासून रांगा लागल्या होत्या. ९० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनीही मतदान करून भावी पिढी व्यसनमुक्त राहील याची काळजी घेतली. कोणत्याही स्थितीमध्ये आमच्या गावात बार होऊ देणार नाही, असा संकल्प सर्वांनी केला. पनवेल बाजार समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील, कर्नाळा स्पोर्ट अॅकॅडमीचे रवीशेठ पाटील यांनी आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.