Lockdown in Maharashtra: राज्यात लॉकडाऊन, जिल्हाबंदी किंवा लोकल बंदी नाही, नाही, नाही! राजेश टोपेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 06:43 AM2022-01-07T06:43:45+5:302022-01-07T06:44:05+5:30
corona Virus in Maharashtra: राज्यात बुधवारी २५ हजार पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यातील १५ हजार रुग्ण मुंबईतील होते. बुधवारी ६० हजार चाचण्या झाल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी मुंबईतील लोकल ट्रेन बंद करण्याचा किंवा जिल्हाअंतर्गत बंदीचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्तरावरील विचारविनिमयानंतर कठोर निर्बंधांचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खा. शरद पवार यांनी आरोग्य मंत्री टोपे यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. वाढती रुग्णसंख्या, लसीकरणासह विविध उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले की, बुधवारी कोरोनाच्या २५ हजार केसेस सापडल्या. उद्या कदाचित ३५ हजार केस असू शकतील. त्यामुळे त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिका-यांशी चर्चा केली. सध्या घातलेल्या निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी करा. अत्यावश्यक नसलेल्या सेवांमुळे जर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असेल तर त्यासाठी काही अधिक निर्बंध वाढवायची गरज भासली तर तेही घालावेत, अशा प्रकारची चर्चा करून शरद पवार यांनी आढावा घेतला.
मुंबई, पुणे, ठाण्यातील शाळा व काॅलेजही बंद केली आहेत. पण शाळा-काॅलेज बंद केल्यानंतर या वयोगटातील तरुण-तरुणी माॅल, रेस्टॉरंटमध्ये गर्दी करू लागले तर उद्देश साध्य होणार नाही याकडे या बैठकीत लक्ष वेधण्यात आले. लसीकरण, औषधे, निर्बंधांवर चर्चा झाली. त्यानुसार सार्वजनिक कार्यक्रम, लग्नसोहळ्यांमधील संख्येच्या मर्यादेची कठोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
रात्रीची संचारबंदी व वीक एंड लॉकडाऊनच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर टोपे म्हणाले की, या सर्वांच्या संदर्भात चर्चा झाली, पण कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील. सर्व यंत्रणांसह संबंधित घटकांशी चर्चा करूनच असे निर्णय घेतले जातात, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.
संसर्ग घशापर्यंतच
राज्यात बुधवारी २५ हजार पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यातील १५ हजार रुग्ण मुंबईतील होते. बुधवारी ६० हजार चाचण्या झाल्या. त्यापैकी १५ हजार चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. म्हणजे पॉझिटिव्हिटी रेट २५ टक्के आहे. पण, रुग्ण संख्येत वाढ होत असली तरीही रुग्णालयातील खाट्या मोठ्या संख्येने रिक्त आहेत. ऑक्सिजनची मागणी वाढलेली नाही. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी जमेच्या बाजू आहेत, असे राजेश टोपे म्हणाले. तिसऱ्या लाटेमध्ये सध्या फुप्फुसापर्यंत हा संसर्ग पोहोचत नाही. केवळ घशापर्यंत संसर्ग मर्यादित आहे. घसा, नाकापर्यंत लक्षणे आढळतात. घशात खवखव, सर्दी होणे अशी लक्षणे जाणवत असल्याचे टोपे म्हणाले.
८० लाख लोकांनी लसच घेतली नाही
nअद्याप ७० ते ८० लाख लोकांनी एकही लस घेतलेली नाही, अशी माहिती शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत सांगण्यात आली. तेव्हा लसीकरणाचा वेग वाढवा प्रत्यकांनी लस घेतलीच पाहिजे, असे शरद पवारांनी स्पष्ट केले. एक लस घेतल्यानंतर दुसऱ्या लसीची तारीख उलटून गेल्यावरही अनेकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. त्यांनी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे.
nफ्रंटलाईन व हेल्थ वर्कर्स, सहव्याधी असलेल्या व्यक्ती व वयाची साठी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना १० जानेवारीपासून बूस्टर डोस दिला जाणार आहे. स्वत: शरद पवारसुद्धा तिसरा डोस घेतील, असे राजेश टोपे म्हणाले.
‘कोविड रुग्णासोबत एक नातेवाईक राहू शकणार’
सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवताना त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्यप्रकारे उपचार आणि देखरेख करण्यात यावी. तसेच रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर रुग्णासाेबत केवळ एकाच नातेवाइकाला बरोबर राहण्याची परवानगी देण्यात यावी. जेणेकरून अधिक संसर्ग पसरणार नाही, असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. राज्यातील कोविडची सध्याची परिस्थिती आणि वैद्यकीय शिक्षण विभाग करत असलेल्या उपाययोजना याबाबतच्या आढावा बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीस वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मात्र कोरोना रूग्णासोबत नातेवाईक राहू लागले तर ते बाधित होणार नाहीत का? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.