यापुढे दहावीत एकही विद्यार्थी होणार नाही नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2016 07:50 PM2016-08-30T19:50:22+5:302016-08-30T19:50:22+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापास शेरा या पुढील काळात गुणपत्रिकेवर वापरला जाणार नाही.

No longer going to be a tenth and no student | यापुढे दहावीत एकही विद्यार्थी होणार नाही नापास

यापुढे दहावीत एकही विद्यार्थी होणार नाही नापास

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 30 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापास शेरा या पुढील काळात गुणपत्रिकेवर वापरला जाणार नाही. राज्याच्या शिक्षण विभागाने या संदर्भात निर्णय घेतला असून राज्य मंडळाकडून  निर्णयाची अंमलबजावणी जुलै-आॅगस्ट 2016 च्या परीक्षेपासून तात्काळ केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये, या उद्देशाने राज्य मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांची जुलै-आॅगस्ट महिन्यातच पुरवणी परीक्षा घेतली जात आहे. विद्यार्थी दहावीत अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना पुढील शैक्षणिक प्रगतीचे मार्ग उपलब्ध होत नव्हते. परिणामी विद्यार्थ्याच्या मानसिक व शारीरिक स्वास्थावर विपरीत परिणाम होत होते. तसेच बरेच विद्यार्थी विघातक कामांकडे वळत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यातच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर केवळ पास किंवा नापास असे दोनच शेरे दिले जात होते. तसेच एक किंवा दोन विषयात नापास होणारे विद्यार्थी एटीकेटी सुविधेचा लाभ घेवून काही अटींवर अकरावीसाठी पात्र असतील असाही उल्लेख गुणपत्रिकेवर केला जात नव्हता. मात्र, जुलै-आॅगस्ट 2016 च्या पुरवणी परीक्षेच्या गुणपत्रिकेवर व फेब्रुवारी/मार्च 2017 पासून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर नापास शेरा वापरला जाणार नाही, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे म्हणाले, फेब्रुवारी/ मार्च 2017 पासून परीक्षेस प्रविष्ठ होणारे विद्यार्थी एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण झाल्यास गुणपत्रिकेवर नापास असा शेरा न देता ‘एटीकेटीसह अकरावी प्रवेशास पात्र’ असा शेरा दिला जाईल.  तीन किंवा त्या पेक्षा जास्त विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘पुरवणी परीक्षेस पात्र’असा शेरा तर सर्व विषयात उत्तीर्ण असल्यास उत्तीर्ण असाच शेरा राहिल. जुलै- आॅगस्ट 2016 च्या पुरवणी परीक्षेपासून तीन किंवा त्या पेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘ केवळ कौशल्य विकास अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र’असा शेरा देण्यात येईल.
 
आॅनलाईन गुणपत्रिकेवर अकरावीत प्रवेश 
पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुळ गुणपत्रिका मिळण्यास उशीर होतो. मात्र, हा विलंब टाळण्यासाठी राज्य मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आॅनलाईन निकालाच्या प्रिट आऊटवरून विद्यार्थ्यांना तात्पूर्ता प्रवेश दिला जाईल. निकालाच्या प्रिंट आऊटवर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेण्यात येईल.मात्र,एका महिन्याच्या आत मुळ गुणपत्रिका महाविद्यालयाकडे जमा करावी लागेल. प्रिंट आऊट व मुळगुणपत्रिकेत तफावत असल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करावा,असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.

Web Title: No longer going to be a tenth and no student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.