"जगातील कोणतीही शक्ती भारताला दुर्बल करू शकणार नाही; राज्यकर्ते येतील-जातील पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 16:54 IST2025-03-30T16:53:45+5:302025-03-30T16:54:38+5:30

ह्या देशाच्या संविधानाने देश एकसंध ठेवला. त्यामुळे हा देश एकसंध  ठेवण्याचं श्रेय कुणाला जात असेल तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातं असं त्यांनी सांगितले.

No matter how many crises and pressures there were, the Constitution of this country kept the country united, Sharad Pawar on India | "जगातील कोणतीही शक्ती भारताला दुर्बल करू शकणार नाही; राज्यकर्ते येतील-जातील पण..."

"जगातील कोणतीही शक्ती भारताला दुर्बल करू शकणार नाही; राज्यकर्ते येतील-जातील पण..."

मुंबई - डॉ. बाबासाहेबांनी आपली घटनाच अशी लिहिली आहे ज्यामुळे भारत देशावर कितीही आघात झाले तरी देश एकसंधच राहील. जगातील कोणतीही शक्ती ह्या देशाला दुर्बल करू शकणार नाही. राज्यकर्ते येतील - जातील पण लोकशाहीचा मार्ग हा कुणालाच सोडता येणार नाही. अनेकदा काही निर्णय घेतले गेले आणि कालांतराने मागे घ्यावे लागले. आणीबाणीचा निर्णय घेतला गेला. तेव्हा लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारं  इंदिरा गांधींसारखं नेतृत्व आणीबाणीच्या माध्यमातून संविधानावर आघात करतंय  असं जाणवताच जनतेने भूमिका घेतली आणि तेव्हा इंदिरा गांधींनाही पराभवाला  सामोरं जावं लागलं असं सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संविधान गौरव सोहळा कार्यक्रमात केले.

यावेळी शरद पवार म्हणाले की, आज हिंदुस्थानच्या आजूबाजूच्या देशांची परिस्थिती काय आहे? श्रीलंका पाहा, तिथे लष्करशाही आली. पाकिस्तान, चीन बघा, तिथे हुकूमशाही  आली. बांगलादेशची परिस्थिती बघा, तिथेही लष्कराचं राज्य आलं. त्यामुळे  आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये बदल घडत त्या देशातील घटनेवर आघात होत राहिले पण भारत हा एकमेव देश आहे जिथं कितीही संकटं आली, कितीही दबाव आला तरीही  ह्या देशाच्या संविधानाने देश एकसंध ठेवला. त्यामुळे हा देश एकसंध  ठेवण्याचं श्रेय कुणाला जात असेल तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातं असं त्यांनी सांगितले.

तसेच बाबासाहेब आंबेडकर हे कायदे आणि न्याय मंत्री होते, विद्युत निर्मिती  मंत्री होते, जलसंधारण मंत्री होते. त्यांनी एक मोठं काम केलं. ते मोठं काम  म्हणजे आज पण प्रगतीच्या दिशेने वीज आणि पाणी ह्या विषयांना अतिशय प्राधान्य देतो. पण ह्या विषयांसंबंधीची धोरणी सुरुवात आंबेडकरांनी आपल्या देशात केली. आज पंजाब असो, हरियाणा असो... ९८%  क्षेत्र ओलिताखाली आहे, त्यामुळे ह्या देशातील जनतेची अत्यंत महत्त्वाची  गरज त्यांनी भागवली. हे कशामुळे झालं ? तर भाक्रा नांगल नावाचं एक धरण  झालं. ह्या धरणाचा निर्णय केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून कुणी घेतला असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी घेतला होता. एवढं मोठं धरण त्यांनी  बांधलं आणि अशी अनेक धरणं व्हावीत ह्याचीही व्यवस्था केली. त्या धरणांमधून  गावाला, शेतीला पाणी दिलं आणि त्यामधूनही वीज तयार केली म्हणजेच सर्वांगाने समाजातील अंधःकार दूर करण्याचं मोलाचं काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  स्वातंत्र्यपूर्व काळातच करून ठेवलं होतं अशी आठवण शरद पवारांनी सांगितली. 

दरम्यान, आपण कुठेही  असोत, कुठल्याही राजकीय पक्षाचे असोत, संघटनेचे असोत पण आपण एका  गोष्टीसंबंधीचा निकाल घेतला पाहिजे की, आम्ही काहीही गोष्टी मान्य करू पण  संविधानाचं रक्षण ह्यात तडजोड होणार नाही. ते संविधान आणि त्याचं महत्त्व  हे समजण्यासाठी शेवटच्या माणसापर्यंत संविधान, संविधानाचा विचार,  संविधानाचं योगदान व निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कष्ट  हा देश कधी विसरणार नाही असंही शरद पवारांनी म्हटलं.  

Web Title: No matter how many crises and pressures there were, the Constitution of this country kept the country united, Sharad Pawar on India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.