निकाल काहीही आला तरी महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल होणार; सत्तासंघर्षात भाजपाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 09:32 AM2023-05-11T09:32:08+5:302023-05-11T09:32:55+5:30
निकालावर जर-तर करता येत नाही. जो निकाल येईल तो मान्य करून केंद्रीय, राज्यस्तरीय नेतृत्व त्यावर पुढे काय करायचे हे ठरवतील असंही बावनकुळेंनी सांगितले.
धाराशिव - शिंदे-फडणवीस सरकारचे काय होणार असा प्रश्न सध्या राज्यातील प्रत्येक नागरिकाला पडला आहे. सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावर आज निकाल येणार आहे. कोर्टाचे ५ न्यायाधीश या प्रकरणी निर्णय देतील. मात्र त्याआधीच राज्यातील राजकारणात वेगाने हालचाली सुरू झाल्यात आहेत. त्यातच सुप्रीम कोर्टाचा निकाल काहीही आला तरी मविआची वज्रमूठ सैल होणार असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आमच्या सरकारला कुठलाही धोका नाही. आमचा प्लॅन २०२४ चा पक्का आहे. आम्ही त्याची तयारी करतोय. जास्त भर आमचा २०२४ वर आहे. सरकार बहुमतात आहे. उद्या बहुमत सिद्ध करायला सांगितले तरी आकडे वाढतील. कुठल्याही परिस्थितीत बहुमताचा आकडा कमी होणार नाही. ४८ लोकसभा, २०० हून अधिक विधानसभा जागा जिंकण्यावर आमचा भर आहे. निकाल लागला म्हणजे सरकार कोसळणार, राष्ट्रपती राजवट लागणार, निवडणुका लागतील यापैकी काहीही होणार नाही. हे सरकार जनतेने स्वीकारले आहे. भाजपा-शिवसेनेची नैसर्गिक युती आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत निकालावर जर-तर करता येत नाही. जो निकाल येईल तो मान्य करून केंद्रीय, राज्यस्तरीय नेतृत्व त्यावर पुढे काय करायचे हे ठरवतील. आमच्याकडे नेतृत्व एकत्रित बसून विचार करेल. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आकलन करू नये. ज्यारितीने प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. घटनात्मक बाबी कोर्ट ज्या निकालात आणेल त्यावर बोलणे योग्य ठरेल. निकालाआधीच काही बोलले तर ते योग्य ठरणार नाही असं बावनकुळे म्हटलं.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाचा निकाल काहीही आला तरी महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल होणार आहे. मी कुठल्याही पक्षाचे नाव घेत नाही. वज्रमूठला तडे जातील. २०२४ ला नरेंद्र मोदींची लाट, राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व यामुळे पुढील निवडणुकाची उत्सुकता असणार आहे असंही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.