एकही मंत्री भ्रष्ट नाही !

By admin | Published: July 23, 2016 06:45 AM2016-07-23T06:45:52+5:302016-07-23T07:06:49+5:30

विरोधकांना सल्ला देत आपल्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री भ्रष्टाचारी नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ठामपणे सांगितले.

No minister is corrupt! | एकही मंत्री भ्रष्ट नाही !

एकही मंत्री भ्रष्ट नाही !

Next


मुंबई : एकच आरोप करा, पण जोरदार करा. उगाच हवेत वार करू नका, असा विरोधकांना सल्ला देत आपल्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री भ्रष्टाचारी नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ठामपणे सांगितले. तर कलंकित मंत्र्यांबाबत समाधानकारक उत्तर न देता सरकारने पळ काढला, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केला.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह विरोधकांनी आरोप केलेल्या सर्व मंत्र्यांची पाठराखण मुख्यमंत्र्यांनी केली. पंकजा मुंडे, गिरीश महाजन, दिवाकर रावते, जयकुमार रावल, संभाजी पाटील निलंगेकर, रवींद्र वायकर आणि रवींद्र चव्हाण आदी मंत्र्यांवर विरोधकांनी विविध आरोप ठेवले होते. खडसे यांना दाऊदच्या पत्नीचे कॉल्स आल्याच्या आरोपातून लोकायुक्तांनीच निर्दोष मुक्तता केली आहे. एसीबीने कोर्टात गजानन पाटीलविरुद्ध दाखल केलेल्या अरोपपत्रात कुठेही खडसेंचे नाव नाही. तसेच, दाऊदच्या पत्नीने त्यांच्या नंबरवर कॉल्स केलेच नव्हते, हेही आता स्पष्ट झाले आहे.
शिवाय, खडसेंवर या बाबत आरोप करणाऱ्या मनीष भंगाळेला पुरावेही देता आलेले नाहीत. आता तो त्याचे मेल हॅक झाल्याचे सांगत आहे. या प्रकरणी चौकशी करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘असे होते तर मग खडसेंनी राजीनामा का दिला?’, अशी विचारणा विरोधी पक्ष सदस्यांनी जागेवर बसूनच केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, पुण्याच्या जमीन प्रकरणी चौकशीसाठी न्या.झोटिंग समिती नेमली असून ती तीन महिन्यांत अहवाल देईल. मी स्वत: त्यावेळी खडसेंशी चर्चा केली होती. मी मंत्रीपदावर असलो तर निर्दोष सुटलो तरी चौकशीत दबाव टाकल्याचा आरोप होईल त्यापेक्षा चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा देतो, असे खडसे यांनीच आपल्याला मला सांगितले. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
>हाथी चले बाजार तो...
विरोधी पक्षांनी आमच्यावर आरोप केले. हाथी चले बाजार तो कुत्ते भोंकते हजार, अशी एक म्हण आहे.
आता या म्हणीचे दोन अर्थ होतात असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोणाला कुत्ते म्हटल्याचा आरोप होऊ शकतो तर दुसरा अर्थ असाही आहे की आरोपांचे मनावर घ्यायचे नसते.
मुख्यमंत्र्यांच्या या टीकेने घायाळ झालेल्या विरोधकांनी त्यांचे भाषण संपताच गदारोळ केला. या गदारोळात उर्वरित कामकाज गुंडाळण्यात आले.

Web Title: No minister is corrupt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.