एकही पैसा केंद्राकडे वळता केला नाही; फडणवीसांनी फेटाळला स्वपक्षीय खासदाराचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 11:51 AM2019-12-02T11:51:23+5:302019-12-02T12:20:24+5:30
अनंत कुमार हेगडेंचं विधान चुकीचं; फडणवीसांचं स्पष्टीकरण
मुंबई: केंद्राकडून आलेला निधी परत पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री झाल्याचा दावा भाजपाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडेंनी केला. हेगडेंचा हा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. केंद्राला एकही पैसा परत देण्यात आलेला नाही. या प्रकरणी राज्य सरकारच्या अर्थ विभागानं सत्य समोर आणावं, असं आवाहन फडणवीस यांनी केलं.
#WATCH Former Maharashtra CM & BJP leader Devendra Fadnavis on Ananth K Hegde (BJP) remark, 'Devendra Fadnavis became CM & in 15 hours he moved Rs 40,000 crores back to Centre': No such major policy decision has been taken by me as CM. All such allegations are false. pic.twitter.com/wSEDOMGF4N
— ANI (@ANI) December 2, 2019
केंद्राकडून आलेला ४० हजार कोटी रुपयांचा निधी परत पाठवण्यासाठी मी मुख्यमंत्री झालो होतो, या वृत्तात अजिबात तथ्य नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 'केंद्राला निधी परत करता यावा यासाठी मुख्यमंत्री झालो असा दावा करण्यात आला. त्या दाव्याचं मी खंडन करतो. बुलेट ट्रेन हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. त्यात महाराष्ट्र सरकार केवळ भूसंपादनाचं काम करत आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्राला निधी देण्याचा प्रश्नच येत नाही,' असं फडणवीस यांनी सांगितलं.
Ananth K Hegde,BJP: A CM has access to around Rs 40,000 Cr from Centre.He knew if Congress-NCP-Shiv Sena govt comes to power it would misuse funds meant for development. So it was decided that there should be a drama.Fadnavis became CM&in 15hrs he moved Rs40,000 Cr back to Centre pic.twitter.com/3SNymN1eMQ
— ANI (@ANI) December 2, 2019
'बुलेट ट्रेन असो वा इतर कोणता प्रकल्प, केंद्र सरकारनं राज्याकडे पैसा मागितलेला नाही. त्यामुळे राज्यानंदेखील केंद्राला पैसा दिलेला नाही. फडणवीस ४० हजार कोटी रुपये केंद्राला परत करण्यासाठी मुख्यमंत्री झाले, हे अतिशय चुकीचं विधान आहे. बुलेट ट्रेनच नव्हे, तर इतर कोणत्याही प्रकल्पातला पैसा राज्य सरकारनं केंद्राला परत पाठवलेला नाही. मुख्यमंत्री किंवा काळजीवाहू मुख्यमंत्री असताना मी असा कोणताही निर्णय घेतला नाही. ज्याला सरकारची आर्थिक निर्णय प्रक्रिया समजते, त्याला ही गोष्ट समजू शकते. अशा प्रकारे पैसा देता-घेता येत नाही', असं माजी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारच्या अर्थ विभागानं सत्य समोर आणावं, असं आवाहनदेखील त्यांनी केलं.
काय म्हणाले होते हेगडे?
आमचा माणूस महाराष्ट्रात ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाल्याचं तुम्हाला माहीत असेल. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांनी ८० तासांत राजीनामा दिला. त्यांनी हे सगळं नाट्य का घडवून आणलं? बहुमत नसतानादेखील ते का मुख्यमंत्री झाले? त्यांनी असा निर्णय का घेतला? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत,' असं हेगडे म्हणाले. यानंतर त्यांनी फडणवीस यांच्या ८० तासांच्या मुख्यमंत्रिपदामागचं राजकारण आणि अर्थकारण सांगितलं. 'काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचं सरकार आल्यास केंद्राकडून देण्यात आलेल्या निधीचा गैरवापर होईल याची फडणवीसांना कल्पना होती. त्यामुळेच संपूर्ण नाट्य रचण्यात आलं आणि मुख्यमंत्री होताच १५ तासांमध्ये फडणवीसांनी ४० हजार कोटींचा निधी केंद्राकडे परत पाठवला,' असं हेगडे यांनी सांगितलं.