यापुढे युती नाही!
By admin | Published: February 5, 2017 12:44 AM2017-02-05T00:44:46+5:302017-02-05T00:44:46+5:30
केवळ पोकळ आश्वासने आणि फुकटचे श्रेय घेणाऱ्यांच्या साथीतून आता आपण बाहेर पडलो आहे. पुन्हा युतीच्या राजकारणात पडायचे नसून ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे
मुंबई : केवळ पोकळ आश्वासने आणि फुकटचे श्रेय घेणाऱ्यांच्या साथीतून आता आपण बाहेर पडलो आहे. पुन्हा युतीच्या राजकारणात पडायचे नसून ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे, त्यामुळे सेना संपवू म्हणविणाऱ्यांना कायमचे हद्दपार करीत मुंबई महापालिकेवर एकट्याने भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले.
गिरगावातील चिराबाझार येथील सभेने सेनेच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी उद्धव यांनी पंतप्रधान मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्र कारभारावर कडाडून हल्ला चढविला. केंद्रीय अर्थमंत्रालयाने मुंबई महापालिकेचा कारभार सर्वाधिक पारदर्शी असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे,त्यामुळे आमच्या कारभारावर टीका करणारे तोंडावर आपटले आहेत, असा टोला मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे नाव न घेता हाणला.
ते म्हणाले,‘ महाराष्टा्रमध्ये गेल्यावर्षी दुष्काळ होता. मात्र केंद्राकडून पुरेशी मदत झाली नाही. आता यंदा चांगला पाऊस झाला तर यांनी नोटबंदी आणून सर्वसामान्य, शेतकऱ्यांचे आयुष्य अडचणीत आणले. भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये वचननाम्यात पीककर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. मग माझ्या राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज का माफ नाही केले? तुमची सत्ता आहे ना, तर मग का नाही निर्णय घेत? असा सवाल करीत उद्धव म्हणाले, निवडणूका जिंकण्यासाठी खोटी आश्वासने द्यावयाची ही त्यांची पद्धत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात आमच्यात मनभेद आहेत. माझे त्यांना खुले आवाहन आहे की, मनभेद की मतभेद ते समोरासमोर येऊन लोकांना सांगा. अमित शहा तुम्ही हिंदुत्व सोडलंत, राष्ट्रीयत्व सोडले. पण आम्ही सोडणार नाही. म्हणून आमचे मतभेद आहेत. कधी म्हणतात फ्रेंडली, तर कधी महाभारतातील कौरव पांडवाची लढाई आहे, असे म्हणतात. महाभारत खेळायचे असल्यास पहिल्याद श्रीखंडी, पाखंडी ही पात्रे समोर येऊ देत मग त्यांना हिसका दाखवू.’ (प्रतिनिधी)
निर्णय का नाही?
महाराष्टा्रमध्ये गेल्यावर्षी दुष्काळ होता. मात्र केंद्राकडून पुरेशी मदत झाली नाही. आता यंदा चांगला पाऊस झाला तर यांनी नोटबंदी आणून सर्वसामान्य, शेतकऱ्यांचे आयुष्य अडचणीत आणले. भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये वचननाम्यात पीककर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. मग माझ्या राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज का माफ नाही केले? तुमची सत्ता आहे ना, तर मग का नाही निर्णय घेत? असा सवाल करीत उद्धव म्हणाले, निवडणूका जिंकण्यासाठी खोटी आश्वासने द्यावयाची ही त्यांची पद्धत आहे.