कुठल्याही पार्किंगसाठी यापुढे पैसे
By admin | Published: September 19, 2016 03:24 AM2016-09-19T03:24:08+5:302016-09-19T03:24:08+5:30
१ आॅक्टोबरपासून महापालिकेने निश्चित केलेल्या पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्या
ठाणे : रस्त्यांवर अस्ताव्यस्तपणे गाड्या पार्ककेल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी येत्या १ आॅक्टोबरपासून महापालिकेने निश्चित केलेल्या पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रविवारी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. रात्रीच्यावेळी रस्त्यावर पार्क होणाऱ्या गाड्यांचेही पार्किंग शुल्क वसूल करण्याचे आदेशही त्यांनी दिले. ही वसुली ट्रॅफिक वॉर्डनच्या माध्यमातून केली जाणार आहे.
आयुक्तांनी रविवारी नगर अभियंता आणि संबंधित विभागाच्या अभियंत्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर येत्या १ आॅक्टोबरपासून महासभेने मंजूर केलेल्या ठरावानुसार या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे पार्किंग झोननुसार महासभेने जे दर निश्चित केले आहेत, त्या दराने वसुली करावी, असेही त्यांनी सूचित केले.
या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्तीचा देकार मागवून एजन्सी निश्चित करण्यात येणार असून, ट्रॅफिक वॉर्डनच्या माध्यमातून ही वसुली करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्यावेळी ज्या गाड्या महापालिकेच्या रस्त्यावर पार्ककरण्यात येतात, त्या गाडयांसाठी विशेष सशुल्क पास व्यवस्था करण्यात येणार आहे.
महासभेने ठरवलेल्या शुल्कानुसार संबंधितास वार्षिक किंवा एका महिन्याचा पास देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभाग समितीनिहाय पार्किंग झोन कुठे आहेत, याची यादी तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रभाग समिती कार्यालयांमधून त्याचे नियंत्रण करण्यात येणार आहे. याबाबतचा आराखडा एका आठवड्यात तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी नगर अभियंता यांना दिल्या आहेत.