ना चित्रपटांची नावे, ना नेत्यांची, त्याने आपल्या रिक्षावर लिहिलं ‘चांद्रयान-२’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 10:41 AM2019-10-11T10:41:07+5:302019-10-11T10:43:44+5:30
शास्त्रज्ञांचा अभिमान : यानाशी संपर्क होण्याची अशोक नागभुजंगे यांना आशा
सोलापूर : अनेकदा शहरातील रिक्षांवर लिहिलेला मजकूर आपले लक्ष वेधून घेत असतो. शेरोशायरी, चित्रपटांची नावे, अण्णा-दादांची नावे, फॅन आॅफ दी, अभिनेत्यांची नावे देखील लिहिलेली असतात. आपल्या देशाचा अभिमान असलेला एखादा मजकूर लिहिलेली रिक्षा सहसा दिसत नाही. मात्र, अशोक नागभुजंगे यांची रिक्षा याला एक अपवाद ठरत आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांच्या प्रयत्नाला सलाम करावा, यासाठी रिक्षावर चांद्रयान-२ असे लिहिल्याचे रिक्षाचालक नागभुजंगे यांनी सांगितले.
अशोक नागभुजंगे यांचा मुलगा आठवीमध्ये शिकतो. वृत्तपत्र, दूरचित्रवाणी आणि शाळेमधून त्याला चांद्रयानाची माहिती मिळाली. त्याने आपल्या वडिलांना रिक्षावर चांद्रयान-२ लिहा, असे सांगितले. अशोक नागभुजंगे यांना रिक्षावर इतर क ाहीतरी लिहिण्याची इच्छा नव्हती. वृत्तपत्रातून त्यांना चांद्रयानाची माहिती आधीच मिळाली होती. आपले शास्त्रज्ञ चांद्रयान-२ मोहीम राबविण्यासाठी दिवस-रात्र कष्ट घेत आहेत. त्यांच्या कष्टाप्रति आदरभाव म्हणून तसेच आपल्या मुलाची इच्छा म्हणून त्याने चांद्रयान-२ असे आपल्या रिक्षावर लिहिले.
७ सप्टेंबर, २०१९ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार १:५२ वाजता हे चांद्रयान उतरत असताना चंद्रतलापासून २,१०० मीटर उंचीवर होते, त्यावेळी यानाशी संपर्क तुटला. हे यान कोसळले असल्याची शक्यता आहे. ‘इस्त्रो’ची महत्त्वाकांक्षी मोहीम असलेल्या ‘चांद्रयान-२’च्या अखेरच्या टप्प्यात चांद्रभूमीपासून केवळ २.१ कि.मी. उंचीवर असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने देशभरातील खगोलप्रेमींना आणि भारतीय शास्त्रज्ञांना धक्का बसला. यामुळे अशोक नागभुजंगे यांना देखील वाईट वाटले. मात्र ते अजूनही आशावादी आहेत.
‘चांद्रयान-२’चे सोलापूरकरांना आकर्षण
- गगनयान ही भारताची एक अंतराळ मोहीम आहे. ही मोहीम इस्रोतर्फे राबविली जात आहे. या मोहिमेद्वारे भारतीय अंतराळवीर अवकाशात राहणार आहेत. ही मोहीम तीन ते चार वर्षात पूर्ण होणार आहे. यासाठी सरकारने पैशांची तरतूद केली असल्याचे अशोक नागभुजंगे यांनी सांगितले. एकूणच सोलापूरकरांना चांद्रयान-२ या मोहिमेविषयी आकर्षण आहे. गणेशोत्सव व नवरात्रीमध्येही काही मंडळांनी ‘चांद्रयान-२’चा देखावा साकारला होता. दसºयाच्या मिरवणुकीत शाहीर वस्ती येथील जागृती नवरात्र महोत्सव मंडळाने चांद्रयान-२ व क्षेपणास्त्राचा देखावा सादर केला होता.
चांद्रयान पूर्णपणे अयशस्वी झाले, असे मला वाटत नाही. आपल्या देशातील शास्त्रज्ञांचे कष्ट वाया जाणार नाहीत, असे मला मनोमन वाटते. शास्त्रज्ञ के. सीवन व त्यांची टीम अजूनही ‘चांद्रयान-२’शी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. चांद्रयान-२ मोहिमेने भारतीयांच्या मनात घर केले असल्याने तेच मी माझ्या रिक्षावर लिहिले. अनेक प्रवासी रिक्षावर चांद्रयान-२ का लिहिलात असे विचारतात. त्यावेळी चांद्र्रयान-२ मोहिमेबाबतचा आनंद द्विगुणित होतो.
- अशोक नागभुजंगे
रिक्षाचालक.